अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ाच्या तंदुरुस्ती चाचणीचा निकाल लागेपर्यंत न्यूझीलंड दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय भारतीय संघनिवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे रविवारी होणारी निवड समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे.

‘‘भारतीय संघनिवडीच्या दृष्टीने हार्दिकच्या तंदुरुस्तीची नितांत आवश्यकता आहे. राष्ट्रीय निवड समितीने हार्दिकला हिरवा कंदील दिल्यानंतर त्याची संघात थेट निवड होऊ शकते. त्यामुळे निवड समितीला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.

पाठीच्या दुखापतीतून सावरलेला हार्दिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त आहे का, या निर्णयाच्या भारतीय संघ व्यवस्थापन प्रतीक्षेत आहे. गोलंदाजीच्या क्षमता चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला भारत ‘अ’ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली होती. हार्दिक संघात स्थान मिळवू न शकल्यास सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकेल. याचप्रमाणे केदार जाधव एकदिवसीय संघातील स्थान टिकवू न शकल्यामुळे परदेशी खेळपट्टय़ांवर उत्तम तंत्रशुद्ध फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या नावाचीही मधल्या फळीच्या दृष्टीने चर्चा होईल.