करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात जवळपास ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. क्रिकेटची रखडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी आयसीसीने पुढाकार घेत ८ जुलैपासून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरवात होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल निर्णय घेणारं आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल अंतिम निर्णय घेण्यासाठी मात्र दिरंगाई करत आहे. याच मुद्द्यावरुन आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात नाराजीनाट्य सुरु आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाची स्पर्धा खेळवणं कठीण असल्याची कबूली खुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम सप्टेंबर-नोव्हेंबर काळात खेळण्याचं ठरवलं आहे. परंतू यासाठी आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अंतिम निर्णय जाहीर करण्याची वाट बीसीसीआय पाहत आहे. मात्र अद्याप यावर अंतिम निर्णय घेतला जात नसल्यामुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच मेलबर्न शहरात ऑस्ट्रेलियन सरकारने सहा आठवड्यांसाठी पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहून तरी आयसीसीने टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दलचा अंतिम निर्णय घ्यावा असा टोला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी लगावला आहे.

“क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांनीही स्पर्धेचं आयोजन करणं शक्य नसल्याचं सांगितलं होतं. तरीही आयसीसी अंतिम निर्णय घेण्यासाठी इतका वेळ का लावतंय हे न समजण्यासारखं आहे. स्पर्धेचं आयोजन जरी करण्याचं ठरलं, तरीही प्रवास, हॉटेल आणि इतर व्यवस्थांसाठी बरीच कसरत करावी लागेल. ऑस्ट्रेलियन सरकार, देशात आरोग्यव्यवस्थेच्या प्रश्नांवर काम करत आहे. मेलबर्नमधली सध्याची परिस्थिती पाहता, आयसीसीमध्ये जर कोणामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असेल तर त्यांनी तो लवकरात लवकर घेण्याची गरज आहे”, IANS वृत्तसंस्थेशी बोलत असताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आपलं मत मांडलं.

आयसीसी आयोजनाबद्दल अंतिम निर्णय घेण्यास करत असलेली दिरंगाई पाहता, बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनाची तयारी सुरु करण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत श्रीलंका, UAE आणि न्यूझीलंड या तीन देशांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. भारतामधली परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या स्पर्धेचं आयोजन भारताबाहेर होण्याची शक्यता बीसीसीआय अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी आता काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.