जन्म
अमेरिकेतल्या ल्युइसव्हिले, केंटुकी प्रांतात कॅशिअस मार्सेलस क्ले वरिष्ठ आणि ओडेसा ग्रॅडी क्ले या दाम्पत्याचा हा मुलगा. वडील रंगारी आणि आई धुणीभांडय़ांचे काम करणारी अशा सर्वसामान्य कुटुंबात अली यांचा जन्म झाला. केंटुकी प्रांतातील नियमांमुळे काळ्या वर्णाच्या लोकांना बहुतांशी सुविधांपासून वंचित राहावे लागत असे. वांशिक संघर्षांतून १४ वर्षीय इमेट टिलची झालेली हत्या लहानग्या अली यांना चटका लावून गेली.

बॉक्सिंगची प्रेरणा
१२ वर्षांचा असताना अली यांच्या वडिलांनी त्याला बाइक घेतली. मात्र स्थानिक जत्रेदरम्यान ही बाइक चोरीला गेली. चिडलेल्या अली यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चोराला शोधून त्याला बेदम चोपेन असे अली यांनी पोलीस अधिकारी जो मार्टिन यांना सांगितले. स्वत: बॉक्सिंग मार्गदर्शक असलेल्या मार्टिन यांनी अली यांना कसे लढायचे याचे प्रशिक्षण घेण्याचे सुचवले. यातूनच अली यांना बॉक्सिंगची प्रेरणा मिळाली व मार्टिनच अली यांचे पहिले ‘बॉक्सिंगगुरू’ ठरले. मार्टिन यांच्या मार्गदर्शनाखाली अली यांनी असंख्य जेतेपदे जिंकली.

ऑलिम्पिक पदार्पण
वयाच्या १८व्या वर्षीच अली यांनी रोम ऑलिम्पिकमध्ये पदार्पणातच सुवर्णपदकाची कमाई केली. अमेरिकेत परतल्यानंतर मिरवणुकीद्वारे त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. मात्र वांशिक संघर्षांमुळे शाही मेजवानी व अन्य सोयीसुविधा नाकारण्यात आल्या.

‘मोहम्मद अली’ उदय
कृष्णवर्णीय नागरी हक्क चळवळीचे नेते आणि नेशन ऑफ इस्लामचे सदस्य माल्कम एक्स यांच्याशी संलग्नता असलेल्या क्ले यांनी सोनी लिस्टनला पराभूत केल्यानंतर धार्मिक चळवळीशी संलग्नता मान्य केली. धर्मगुरू इलजाह मोहम्मद यांनी क्ले यांना मोहम्मद अली हे नाव दिले. .

व्यावसायिक प्रवेश
ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर आठ आठवडय़ांतच अली यांनी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश करताना पहिली लढत जिंकली. पारंपरिक शैलीला छेद देणारी अली यांची शैली चर्चेचा विषय ठरली.

अली विरुद्ध सरकार
व्हिएतनाम युद्धात अमेरिकेच्या लष्करात सामील होण्यास अली यांनी नकार दिला. नागरी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या युद्धात सहभागी होण्यास नकार दिल्याने अली यांचे अजिंक्यपद स्पर्धेतील पदक काढून घेण्यात आले. त्यांना १०,००० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आणि ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तीन वर्षांनंतर त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली.

शतकातील सर्वोत्तम लढत
जो फ्रेझियर या मातबर प्रतिस्पध्र्याला नमवण्याची किमया अली यांनी केली. मॅडिसन स्क्वेअर येथे झालेली ही लढत लक्षावधी चाहत्यांनी पाहिली. मात्र या लढतीत अली यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

द रम्बल इन द जंगल
हेवीवेट गटातला तत्कालीन विश्वविजेता जॉर्ज फोरमनला चीतपट करत अली यांनी जागतिक स्तरावर वर्चस्व सिद्ध केले. फुलपाखरासारखा तरंगता वावर आणि मधमाशीसारखा डंख हे अली यांच्या खेळाचे गुणवैशिष्टय़ या लढतीत जगासमोर आले.

शांतीदूत
उत्तर कोरिया, अफगाणिस्तान अशा संवेदनशील प्रांतांना अली यांनी शांतीदूत म्हणून भेट दिली. क्युबामध्ये वैद्यकीय मदत म्हणून अली यांनी दहा लाख डॉलर्सची देणगी दिली. १९९० मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांची भेट घेतली.

सन्मान
२००५ मध्ये अमेरिकेतल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले.

पार्किन्सनशी लढत
१९८४ मध्ये अली यांना पार्किन्सन हा गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले. कारकीर्दीत डोक्यावर झेललेल्या ठोश्यांमुळे हा आजार बळावल्याचेही निष्पन्न झाले. आजारपणाशी लढतानाही देखील अली यांनी मोहम्मद अली पार्किन्सन सेंटर संस्थेची स्थापना केली.

ऑलिम्पिक ज्योत
अली यांनी १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र सदिच्छादूत म्हणून अली यांची नियुक्ती करण्यात आली. २००१मध्ये अली यांच्या कारकीर्दीवर चित्रपट प्रदर्शित झाला.

ऑलिम्पिक व्यासपीठावर
५० वर्षांनंतर अली लंडन ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर अवतरले. प्रकृती स्थिर नसल्याने त्यांनी ऑलिम्पिक ज्योत उंचावली नाही. मात्र उद्घाटन सोहळ्यात त्यांनी सहभाग नोंदवला.

निवृत्ती
हेवीवेट गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा राखल्यानंतर ५६-५ अशा स्वप्नवत कामगिरीसह अली यांनी १९८१ मध्ये निवृत्ती घेतली.

प्रवासाची अखेर
जगण्याकरता लढण्याची आणि संघर्ष करण्याची प्रेरणा देणाऱ्या मोहम्मद अली यांचे ४ जून २०१६ रोजी निधन झाले.