13 August 2020

News Flash

पुरुषांमध्ये भारताचे सोनेरी यश

भारताने इंग्लंडला ३-१ असे पराभूत करीत राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेतील पुरुषांमध्ये सुवर्णपदक मिळवले.

*महिलांमध्ये रौप्यपदकाची कमाई

*राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा

भारताने इंग्लंडला ३-१ असे पराभूत करीत राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेतील पुरुषांमध्ये सुवर्णपदक मिळवले. २००४नंतर प्रथमच भारताला हे विजेतेपद मिळाले. महिलांमध्ये भारताने चौथ्यांदा रौप्यपदक मिळवले. सिंगापूरने भारताला ३-१ असे हरवत महिलांचे सुवर्णपदक मिळाले.

दीनदयाळ उपाध्याय स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील दोन्ही गटांत भारताने अंतिम फेरी गाठल्यामुळे कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. राष्ट्रकुलमध्ये अव्वल स्थान असलेल्या सिंगापूरने महिलांच्या अंतिम फेरीत भारताला ३-१ असे हरवले. त्या वेळी मौमा दासने कोह काई झिन पेअर्लीन हिच्यावर मिळविलेल्या विजयाचा अपवाद वगळता, या लढतीत सिंगापूरच्या खेळाडूंचा वरचष्मा होता. लिन येईने दोन सामने जिंकून महत्त्वाचा वाटा उचलला. तिने अंकिता दासला ९-११, ११-८, ११-७, ११-८ असे पराभूत करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ तिची सहकारी झोऊ यिहानने मनिका बात्राचा ११-९, ११-८, ८-११, ११-९ पेअर्लीनवर ११-८, ११-७, ११-३ असा सहज विजय मिळवत सामन्यातील रंगत कायम ठेवली. तथापि दडपणाखाली खेळणाऱ्या मनिकाला परतीच्या एकेरीत लिनकडून ८-११, ३-११, ६-११ अशी हार स्वीकारावी लागली. ही लढत जिंकून लिनने संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

भारतीय महिलांनी घरच्या वातावरणात खेळताना खूपच दडपण घेतले होते. त्याचा फायदा सिंगापूरच्या खेळाडूंना झाला. त्यांनी भारतीय खेळाडूंचा कमकुवतपणा कोठे आहे हे ओळखून त्याप्रमाणे खेळ केला.

पुरुषांच्या पहिल्या लढतीत भारताच्या हरमित देसाईने पहिले दोन गेम्स जिंकल्यानंतर खेळावरील नियंत्रण गमावले व लढतही गमावली. त्याला डेव्हिड मॅकबीथने ९-११, ३-११, ११-७, ११-९, ११-९ असे हरवले. परंतु भारताच्या सौम्यजित घोषने इंग्लंडकडून खेळणारा श्रीलंकेचा खेळाडू हिशान वीरसिंघेचा ११-७, ११-४, ११-७ असा सहज पराभव करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. साथियन ज्ञानशेखरनने टॉम जेव्‍‌र्हिसवर ११-३, ११-६, ११-५ असा सफाईदार विजय मिळवत भारताला २-१ असे आधिक्य मिळवून दिले. त्याने टॉपस्पिन फटक्यांचा सुरेख खेळ करीत प्रेक्षकांना कौतुकाची संधी दिली. घौषने परतीच्या एकेरीत मॅकबिथला ११-६, ११-१३, ११-९, ११-८ असे हरवत भारताच्या विजेतेपदावर मोहर उमटवली.

एकाच कुटुंबातील तीन खेळाडू

दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथील एकाच मोठय़ा कुटुंबामधील तीन खेळाडू येथे सहभागी झाले आहेत. कॅटलिन लिंगेवेल्ट ही महिला गटामधील वैयक्तिक व सांघिक या दोन्ही विभागात सहभागी झाली आहे. तिचे दोन चुलतभाऊ कूर्ट व किगान हे पुरुष विभागात सांघिक व वैयक्तिक स्पर्धामध्ये उतरले आहेत. हे तिघेही जोहान्सबर्ग येथील वेगवेगळ्या क्लबचे प्रतिनिधित्व करतात. ‘‘आम्ही जरी वेगवेगळ्या क्लबकडून खेळत असलो तरी एकमेकांना मार्गदर्शन करीत असतो व जेव्हा आम्ही देशाचे प्रतिनिधित्व करीत असतो, तेव्हा आम्ही एकाच कुटुंबाचे सदस्य या भावनेने खेळतो,’’ असे कूर्टने सांगितले.

एम्मा भगिनींचा सहभाग

उत्तर आर्यलडच्या महिला संघात एम्मा मॅकसोर्ली व एम्मा लुडलोव या भगिनींचा समावेश आहे. त्या दोघी बेलफास्ट संघाकडून खेळतात. त्यांनी आजपर्यंत अनेक युरोपियन व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. लुडलोव ही युरोपातील अव्वल दर्जाची खेळाडू मानली जाते.

पंच गणेशन यांची ऐतिहासिक कामगिरी

भारताचे पंच एन.गणेशन यांना वरिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत उपप्रमुख पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. ही स्पर्धा क्वालालम्पूर येथे फेब्रुवारीत होणार आहे. जागतिक स्तरावर पंच म्हणून काम करण्याचा मान भारताच्या आत्माराम लेले यांना १९९१ मध्ये मिळाला होता. किबा (जपान) येथे झालेल्या स्पर्धेत लेले यांनी मुख्य पंच म्हणून काम केले होते. गणेशन हे त्रिवेंद्रम येथील रहिवासी असून आजपर्यंत आशियाई, राष्ट्रकुल आदी मुख्य स्पर्धासह शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पंच म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. नवी दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी टेबल टेनिस संकुल उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्याकरिता त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेचा राजीनामा देत ही जबाबदारी समर्थपणे हाताळली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 5:36 am

Web Title: men perform well in commonwealth table tennis championship
Next Stories
1 फिफाच्या शिस्तपालन समितीवर प्लॅटिनींचा बहिष्कार
2 शरीरसौष्ठवाकडे खेळाच्या नजरेतून पाहा
3 राम निवास जेता
Just Now!
X