मायदेशात खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने, विश्वचषक स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. भारताने सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 5-0 ने मात केली. तुलनेने नव्या खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यात फारशा आव्हानाचा सामना करावा लागला नाही.

पहिल्या सत्रात बहुतांश काळ दोन्ही संघ एकमेकांना आघाडी घेण्यास देत नव्हते. भारतीय खेळाडूंनी पहिल्या 7-8 मिनीटांच्या खेळामध्ये गोल करण्याच्या 3 संधीही निर्माण केल्या होत्या. मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारतीय खेळाडूंना यश आलं. अखेर 10 व्या मिनीटाला मनदिप सिंहने पेनल्टी कॉर्नरवर तयार झालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करुन भारताला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या धक्क्यातून आफ्रिकेचा संघ सावरतो न सावरतो तोच 12 व्या मिनीटाला आकाशदीप सिंहने बॉलला गोलपोस्टची दिशा दाखवत पहिल्या सत्राअखेरीस भारताची आघाडी 2-0 अशी भक्कम केली.

दुसऱ्या सत्रातही भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत सामन्याची सुत्र आपल्या हातात राखली. सिमरनजीत सिंहने दुसऱ्या सत्रामध्ये काही चांगल्या चाली रचल्या, मात्र आफ्रिकेचा बचाव भेदणं त्याला जमलं नाही. दरम्यानच्या काळात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनीही सामन्यात आश्वासक पुनरागमन केलं. भारताकडून निलकांत शर्मा, हार्दिक सिंहने आफ्रिकीच्या खेळाडूंना चकवत आश्वासक खेळ केला, मात्र गोल करण्यात ते अपयशी ठरले. अखेर मध्यांतरापर्यंत भारताने सामन्यात 2-0 अशी आघाडी कायम राखली.

तिसऱ्या सत्राचा खेळ बऱ्याच अंशी रंगतदार झाला. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन आघाडी वाढवण्याची संधी मिळाली होती, मात्र या संधीचं रुपांतर गोलमध्ये करण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले. दरम्यानच्या काळात आफ्रिकेनेही भारताची बचावफळी भेदत चांगलं आक्रमण केलं, मात्र गोल करण्यात त्यांनाही अपयश आलं. अखेर 43 व्या मिनीटाला मनदीप सिंहने दिलेल्या पासला सिमरनजीत सिंहने हलकेच गोलपोस्टची दिशा दाखवून भारताची आघाडी 3-0 ने वाढवली. पाठोपाठ 45 व्या मिनीटाला आकाशदीपच्या पासवर ललित कुमार उपाध्यायने सुरेख मैदानी गोल करत संघाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली.

चौथ्या सत्राच्या सुरुवातीला भारताला पेनल्टी कॉर्नरवर संधी मिळाली. याचा पुरेपूर फायदा उचलत सिमरनजीतने 46 व्या मिनीटाला भारताची आघाडी 5-0 ने वाढवली. यानंतरही भारतीय खेळाडूंनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताचं आक्रमण थोपवलं. सामना संपताना भारताने आपली 5-0 ची आघाडी शेवटपर्यंत भक्कम ठेवत बाजी मारली. भारताचा पुढचा सामना बेल्जियमविरुद्ध होणार आहे.