ओडीशातील भुवनेश्वर शहरात आजपासून पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तब्बल ८ वर्षांनी या स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालेलं असून यंदा एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मायदेशी स्पर्धा होत असल्यामुळे यंदा भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होत असली तरीही विश्वचषक स्पर्धेचा इतिहास हा भारताच्या बाजूने नाही. आतापर्यंत झालेल्या १३ विश्वचषक स्पर्धांपैकी भारतीय हॉकी संघाने फक्त एकदाच ही स्पर्धा जिंकली आहे (१९७५ साल). यंदाच्या वर्षी प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी संघात काही अनुभवी खेळाडूंना डावलून तरुण खेळाडूंना जागा दिली आहे. आपला संघ सर्वोत्तम कामगिरी करेल अशी आशा हरेंद्रसिंह यांनी व्यक्त केली असली, तरीही विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहता भारताला ही स्पर्धा नक्कीच सोपी जाणार नाही असं दिसतंय.

  • कितवी विश्वचषक स्पर्धा – १४
  • सर्वाधिक जेतेपद मिळवणारा संघ – पाकिस्तान (४ विजेतेपद)
  • सर्वाधिक पदकं मिळवणारा संघ – ऑस्ट्रेलिया (३ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्य)
  • आतापर्यंतचे विश्वचषक सामने – ५६९
  • आतापर्यंतचे विश्वचषक गोल – २२७६
  • सर्वाधिक विश्वचषक सामने खेळणारा संघ – नेदरलँड (९३ सामने)
  • विश्वचषकात सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा विजयी संघ – ऑस्ट्रेलिया (६४ विजय)
  • सर्वाधिक गोल – नेदरलँड (२७६ गोल)

या आकडेवारीवर नजर टाकली असता एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल ती म्हणजे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपली छाप पाडण्यात नेहमी अपयशी ठरला आहे. २०१० साली दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आठव्या स्थानावर राहिला होता. आतापर्यंत जर्मनी आणि नेदरलँडचा अपवाद वगळता एकाही  यजमान देशाला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. आता विश्वचषकामध्ये कोणत्या संघाने कितीवेळा विजेतेपदं पटकावली आहेत त्यावर एक दृष्टीक्षेप टाकूयात…

  • पाकिस्तान – ४ विजेतेपदं (१९७१, १९७८, १९८१, १९९४)
  • ऑस्ट्रेलिया – ३ विजेतेपदं (१९८६, २०१०, २०१४)
  • नेदरलँड – ३ विजेतेपदं (१९७३, १९९०, १९९८)
  • जर्मनी – २ विजेतेपदं (२००२, २००६)
  • भारत – १ विजेतेपद (१९७५)