29 September 2020

News Flash

Mens Hockey World Cup 2018 : बेल्जियमचा अपवाद वगळता भारताला साखळी फेरीत सोपा पेपर

28 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार

(संग्रहीत छायाचित्र)

28 नोव्हेंबरपासून ओडीशातील भुवनेश्वर शहरामध्ये यंदाच्या हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मानाचं स्थान असलेल्या या स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा भारताला मिळाल्यामुळे, हॉकी प्रेमींच्या अपेक्षांमध्ये वाढ झाली आहे. घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघ यंदा ऐतिहासीक कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे. आजपासून अंदाजे एका आठवड्याने विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल.

तब्बल 16 देश या स्पर्धेत सहभागी होणार असून, यजमान भारताचा समावेश क गटात करण्यात आलेला आहे. या स्पर्धेसाठी भारताला साखळी फेरीत कोणाचं आव्हान असेल, व इतर संघांची बलस्थान नेमकी काय आहेत याची थोडक्यात माहिती आज घेणार आहोत.

अ गट – अर्जेंटिना, फ्रान्स, न्यूझीलंड, स्पेन
ब गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन
क गट – बेल्जियम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका
ड गट – नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान

 

बेल्जियम – जागतिक क्रमवारी तिसरं स्थान

Red Lions या नावाने बेल्जियमचा संघ हॉकी विश्वात ओळखला जातो. मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बेल्जियमला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाहीये. मात्र यंदाच्या विश्वचषकात पुनरागमन करण्याची योग्य संधी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. प्रामुख्याने गोलकिपर विन्सेट वानास्च चा बचाव भेदणं हे भारतीय आक्रमण फळीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे.

याव्यतिरीक्त वॅन डोरेन, बोकार्ड, लोईक ल्युपाएर्ट, जॉन डोमेन ही मधळी फळी भारताचं आक्रमण सहज थोपवू शकते. या खेळाडूंना चकवण्यासाठी यंदा भारतीय संघाला वेगळी व्यूहरचना आखावी लागू शकते. आघाडीच्या फळीतले टॉम बून आणि सेड्रीक चार्ल्रीयर हे देखील भारताची डोकेदुखी वाढवू शकतात.

भारत – जागतिक क्रमवारी पाचवं स्थान

तुलनेने नवीन भारतीय संघ यंदा घरच्या मैदानावर इतिहास रचण्याच्या प्रयत्नाने उतरणार आहे. हरमनप्रीत, अमित, बिरेंद्र लाक्रा या खेळा़डूंवर यंदा भारताची मदार असणार आहे. कर्णधार मनप्रीतचा संयमीपणा यंदाच्या स्पर्धेत संघाला किती फायदेशीर ठरतो हे येणारा काळच ठरवेल. चिंगलीन साना मनप्रीतला चांगली साथ देऊ शकतो, त्याच्याकडूनही भारताला अनेक अपेक्षा आहेत. मात्र साखळी फेरीचा अडथळा दूर केला तरीही उपांत्य फेरीत भारतीय संघ कितपट टिकेल याची शंकाच आहे.

दक्षिण आफ्रिका – जागतिक क्रमवारी पंधरावं स्थान

African Nations Cup स्पर्धेचं विजेतेपद मिळवत दक्षिण आफ्रिकेने यंदाच्या विश्वचषकात प्रवेश मिळवला आहे. या संघाकडून भारताला फारसा धोका नसला तरीही, कर्णधार टीम ड्रमाँड, ऑस्टीन स्मिथ सारखे काही खेळाडू भारताला चांगली टक्कर देऊ शकतात.

कॅनडा – जागतिक क्रमवारी अकरावं स्थान

हॉकी इंडिया लीग स्पर्धेत कॅनडाने भारतावर केलेली मात अजुनही प्रत्येक भारतीय खेळाडूच्या मनात कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत कॅनडाला हलकं लेखण्याची चूक भारतीय संघ अजिबात करणार नाही. आजही कागदावर आणि मैदानात भारताचा संघ हा अधिक वरचढ असला तरीही गॉर्डन जॉन्सटन, केगन परेरा, स्कॉट टंपर सारखे खेळाडू भारताला चांगली टक्कर देऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2018 7:24 pm

Web Title: mens hockey world cup 2018 know which team can challenge india in group stage
Next Stories
1 IND vs AUS : कृणालच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम
2 IND vs AUS : सासुरवाडीत जावईबापू जोमात! शिखरने केला ‘हा’ विक्रम
3 #MeToo प्रकरणात BCCI सीईओ राहुल जोहरी निर्दोष; कामावर रुजु होण्याची परवानगी
Just Now!
X