सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com

मुलुख मैदान
अजूनही पुरुष टेनिसमध्ये फेडरर-नडाल-जोकोविचच्या पलीकडे ग्रँड स्लॅम जेते दिसत नाहीत हे वास्तव आहे. ही मक्तेदारी पुरुष टेनिसला काहीसे एकसुरी बनवू लागली आहे, हेही तितकेच ठळक वास्तव आहे.

अजूनही पुरुष टेनिसमध्ये फेडरर-नडाल-जोकोविचच्या पलीकडे ग्रँड स्लॅम जेते दिसत नाहीत हे वास्तव आहे. ही मक्तेदारी पुरुष टेनिसला काहीसे एकसुरी बनवू लागली आहे, हेही तितकेच ठळक वास्तव आहे. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने त्याचा जुना प्रतिस्पर्धी स्पेनचा राफाएल नडालचा पराभव करून सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि १५व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. टेनिस सम्राट रॉजर फेडरर या स्पर्धेत बराच आधी पराभूत झाला. तर अँडी मरे आणखी काही काळ खेळून विम्बल्डननंतर निवृत्त होईल. गेली काही वर्षे या चौघांशिवाय एखादी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्यांची नावे (स्टॅनिस्लास वॉवरिंका, हुआन मार्टिन डेल पोत्रो, मारिन चिलिच) एका हाताच्या बोटांनी मोजता येतील इतकीच आहेत. २०१७ मध्ये फेडरर आणि नडाल यांनी चार ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे आपसात जणू वाटून घेतली होती. मरे त्या काळात दुखापती आणि खराब फॉर्ममुळे त्रस्त होता. जोकोविच गंभीर दुखापतीवर उपचार घेत होता. २०१८ मध्येही पहिल्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा फेडरर (ऑस्ट्रेलियन) आणि नडाल (फ्रेंच) यांनीच जिंकल्या. नंतर विम्बल्डन, अमेरिकन आणि आता नवीन वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन अशा सलग तीन स्पर्धा जिंकून जोकोविचने फेडरर आणि नडाल यांच्या साम्राज्याला धक्का पोहोचवला आहे. पण म्हणून फेडरर-नडाल संपले असे म्हणण्याचे धाडस करवत नाही. याआधी किमान दोन वेळा फेडरर आणि तीन वेळा नडाल संपल्याची चर्चा सविस्तर झाली होती. तरीही आज कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेत हे दोघे विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असतात, हे वास्तव नाकारता येत नाही.

फेडरर-नडाल-जोकोविच आणि काही प्रमाणात अँडी मरे यांना आव्हान मिळतच नव्हते असे नाही. तरीही जेतेपद मात्र बहुतेकांना हुलकावणी देत राहिले. एका आकडेवारीवर नजर टाकल्यास या त्रिमूर्तीने गेल्या जवळपास दीड दशकात काय धुमाकूळ घालून ठेवलाय याची जाणीव होईल. फेडररने पहिल्यांदा ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले २००३ मध्ये विम्बल्डनला. त्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत फेडररने पीट सॅम्प्रासला हरवले. त्यानंतर सॅम्प्रास कधीही विम्बल्डन जिंकू शकला नाही! जणू विम्बल्डनमध्ये सॅम्प्रास युगाचा अंत झाला आणि फेडरर युग सुरू झाले. आंद्रे आगासीही उतरणीला लागला होता. याउलट अँडी रॉडिक, लेटन ह्य़ुइट, मार्क फिलिपॉसिस, मारात साफिन यांची कारकीर्द मात्र बहरात होती. पण २००५ पासून त्यांच्या कारकीर्दीत किमान ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या बाबतीत अचानक ‘तीव्र दुष्काळा’ला सुरुवात झाली. कारण फेडरर आणि नडाल नामक ‘वाऱ्यां’नी त्यांचे पर्जन्यमानच हिरावून नेले. २००५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मारात साफिनने लेटन ह्य़ुइटला हरवून पटकावले. त्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये नडाल जिंकला, ते त्याचे पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद. पण त्याचे महत्त्व आकडेवारीच्या दृष्टीनेही आहे. कारण त्यानंतर २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जोकोविच जिंकेपर्यंत प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धा फेडरर किंवा नडालच जिंकत होते. २००६ आणि २००७ या दोन्ही वर्षांमध्ये नडालने फ्रेंच ओपन आणि फेडररने बाकीच्या तिन्ही स्पर्धा जिंकल्या. २००८पासून जोकोविच या दोघा दिग्गजांना आव्हान देऊ लागला. परवाच्या त्याच्या ऑस्ट्रेलियन अजिंक्यपदापर्यंत जोकोविचने १५ अजिंक्यपदे पटकावलेली आहेत. २००८ ऑस्ट्रेलियन ओपन ते २०१९ ऑस्ट्रेलियन ओपन या ११ वर्षांच्या कालखंडात अँडी मरे (अमेरिकन २०१२, विम्बल्डन २०१३ आणि २०१६), स्टॅनिस्लास वॉवरिंका (ऑस्ट्रेलियन २०१४, फ्रेंच २०१५, अमेरिकन २०१६), हुआन मार्टिन डेल पोत्रो (अमेरिकन २००९), मारिन चिलिच (अमेरिकन २०१४) यांनी फेडरर-नडाल-जोकोविचची सद्दी संपवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला. अँडी मरेला या तिघांच्या तोडीचा टेनिसपटू म्हणून मानले जाऊ लागले होते. त्याने दोन वेळा विम्बल्डन, ऑलिम्पिक सुवर्णपदक अशी कामगिरी केलीच, शिवाय ११ वेळा तो अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र इतर तिघांप्रमाणे सातत्य, शारीरिक फिटनेस, मानसिक कणखरपणाच्या बाबतीत मरे कमी पडला हे नक्की. पराभूत झाल्यानंतर अश्रूपात करण्याची त्याची सवय सुरुवातीला त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण करून गेली खरी, पण हे वारंवार घडू लागल्यावर कणवेची जागा थट्टेने घेतली. आता फिटनेसविषयीच्या समस्यांना कंटाळून त्याने कारकीर्दच संपवण्याचा निर्णय (रडतरडत!) जाहीर केला. वॉवरिंका या फेडररच्या देशातल्या टेनिसपटूने मरेप्रमाणेच तीन स्पर्धा जिंकल्या, तरी अजूनही त्याला विम्बल्डनमध्ये सूर सापडलेला नाही. मारिन चिलिच आणि हुआन मार्टिन डेल पोत्रोने प्रत्येकी एकेकदा अमेरिकन ओपन जिंकली आणि अनुक्रमे तीन व दोन स्पर्धाच्या अंतिम फेरीतही ते पोहोचले. एका अर्थी हे सगळे निकाल म्हणजे वाळवंटातल्या ओअ‍ॅसिससारखे ठरतात. २०१५ आणि २०१६अशी सलग दोन वर्षे दुखापतग्रस्त फेडरर आणि नडाल एकही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकले नाहीत. पण या काळात जोकोविचने या ‘पोकळी’चा फायदा उठवला आणि पाच स्पर्धा जिंकल्या. दोन स्पर्धा वॉविरकाने, तर एक चिलिचने जिंकली. मात्र २०१७ पासून फेडरर आणि नडाल हे दोघे परतले. जोकोविच सोडून बाकीचे पळाल्यागत झाले! जोकोविच दुखापतग्रस्त होता, त्यामुळे त्या वर्षी दोन स्पर्धा फेडरर आणि दोन स्पर्धा नडाल जिंकला. २०१८ मध्येही पहिल्या दोन स्पर्धा नडाल आणि फेडररने जिंकल्यानंतर प्रत्येक स्पर्धा जोकोविचने जिंकलेली आहे.

म्हणजे अजूनही पुरुष टेनिसमध्ये फेडरर-नडाल-जोकोविचच्या पलीकडे ग्रँड स्लॅम जेते दिसत नाहीत हे वास्तव आहे. ही मक्तेदारी पुरुष टेनिसला काहीसे एकसुरी बनवू लागली आहे, हेही तितकेच ठळक वास्तव आहे. या तिघांनी अनुक्रमे २०, १७ आणि १५ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत. एकाच काळात इतक्या मोठय़ा संख्येने तिघांनी विजयी धडाका चालवल्याचे उदाहरण टेनिस इतिहासात दुसरे नाही. तिघांची शैली वेगळी, त्यांच्या आवडीची टेनिस कोर्ट वेगळी. पण त्यांच्यातील समान दुवे म्हणजे थक्क करायला लावणारा फिटनेस आणि कधीही न शमलेली विजयाची भूक. तिघांवरही आजवर भरपूर लिहून आलेले आहे. मुद्दा हा, की अजूनही या तिघांशिवाय मोजकेच टेनिसपटू ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकताना दिसतात, ही पुरुष टेनिससाठी थोडी नामुष्कीची बाब म्हणावी काय? याउलट स्थिती महिला टेनिसची आहे. तिथेही सेरेना विल्यम्ससारखी प्रदीर्घ काळ जिंकत राहिलेली टेनिसपटू आहेच. पण किमान चालू दशकात सेरेनासह तब्बल १७ टेनिसपटूंनी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आणि यात व्हीनस विल्यम्सचा समावेश नाही! नवीन सहस्रकातील पहिल्या दशकामध्ये सातत्याने जिंकणाऱ्या महिला टेनिसपटूंमध्ये विल्यम्स भगिनी, जस्टिन हाना, किम क्लायस्टर्स आणि काही प्रमाणात जेनिफर कॅप्रियाती व आमेली मॉरेस्मो यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. विल्यम्स भगिनी, शारापोवा, क्लायस्टर्स, हाना यांची मक्तेदारी असतानाही महिला टेनिसमध्ये एखादी नवीनच टेनिसपटू जिंकण्याची उदाहरणे अनेक सापडतात. व्हीनस अस्ताला गेल्यानंतर आणि सेरेना दुखापती, मातृत्व अशा विविध विरामकाळात असताना अनेक टेनिसपटूंनी चमक दाखवली आहे. यामुळे महिला टेनिस पुरुष टेनिसपेक्षा अधिक बेभरवशाचे व त्यामुळेच रंगतदार बनले. याउलट फेडरर-नडाल-जोकोविचच्या पलीकडे पाहण्याची सवयच टेनिसरसिक हरवून बसले की काय अशी शंका येते. अमेरिका आजही टेनिसची पंढरी असली, तरी या देशातून चांगले पुरुष टेनिसपटू नावारूपाला येण्याची प्रक्रिया जवळजवळ थांबली आहे. अँडी रॉडिक हा त्यांचा ग्रँड स्लॅम सर्किटमधला शेवटचा नावाजलेला टेनिसपटू. सॅम्प्रास आणि आगासी अशा अतिरथी-महारथींच्या अस्तानंतर किंवा त्याच्या आसपास रॉडिकचा उदय झाला. २००३मध्ये अमेरिकन स्पर्धा जिंकून आणि त्याच्या जोरावर टेनिसमध्ये अव्वल रँकिंगवर झेप घेऊन त्याने झोकात सुरुवात केली होती. गेल्या दशकात त्याचा खेळ सातत्यपूर्ण होता. त्याच्या २००३मधील ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाव्यतिरिक्त आणखी चार ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये रॉडिक अंतिम फेरीपर्यंत पोहोचला.. आणि दर खेपेला फेडररशीच हरला! याउलट सेरेना अजूनही जिंकत असताना, आता स्लोआन सटीफन्स आणि नओमी ओसाका या गौरेतर अमेरिकन टेनिसपटू युरोपियन टेनिसपटूंना आव्हान देऊ लागल्या आहेत. नओमीने तर सलग दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून गुणवत्ता दाखवून दिली आहे. महिला टेनिसमध्ये सलग दोन स्पर्धा जिंकण्याची कामगिरी चालू दशकात तरी किम क्लायस्टर्स आणि सेरेना विल्यम्स यांनाच साधलेली आहे. यावरूनही महिला टेनिसमधील चुरस लक्षात येऊ शकते.

भविष्यात फेडरर-नडाल-जोकोविचचे वारसदार कोण असतील, याविषयी आताच अंदाज बांधता येणे अवघड आहे. जर्मनीच्या रशियन वंशाच्या, ताडमाड उंचीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने गेल्या वर्षी वर्ल्ड टूर फायनल्स ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली. अजून त्याला ग्रँड स्लॅम सर्किटमध्ये म्हणावी तशी चमक दाखवता आलेली नाही. ग्रिगॉर दिमित्रॉव, मिलॉस राओनिच, बोर्ना कोरिच, निक किर्गियॉस, डानिल मेडवेदेव यांची कामगिरी आशादायक होत आहे. त्यांना अजूनही प्रस्थापित त्रिमूर्तीविरुद्ध सातत्याने जिंकता आलेले नाही. टेलर फ्रिट्झ आणि फ्रान्सिस टियाफो या अमेरिकन युवा टेनिसपटूंकडून त्या देशातील टेनिसरसिकांना आणि तज्ज्ञांना मोठी आशा वाटत आहे. डॉमिनिक थिएम हा ऑस्ट्रियन टेनिसपटूही हल्ली ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये बऱ्यापैकी मजल मारतो. या सगळ्यांनी फिटनेसच्या बाबतीत आणि दुखापतींमधून बाहेर पडण्याच्या क्षमतेबाबत फेडररचा विशेषत्वाने आदर्श घेण्याची गरज आहे. हल्ली या बहुतेक टेनिसपटूंना जॉन मॅकेन्रो, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्गसारखे जुनेजाणते निष्णात टेनिसपटू प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरवतात. तरीही अनेक टेनिसपटूंमध्ये दुखापतींचे प्रमाण मोठे आहे. मरेसारखा अत्यंत गुणी टेनिसपटू दुखापतींना अखेर शरण आला. या ठिकाणी आपल्या लिअँडर पेसचा उल्लेख करणे गरजेचे वाटते. वयाच्या ४५व्या वर्षी आजही दुहेरी टेनिस खेळतोच आहे. त्याच्याविषयी पुन्हा केव्हातरी. तूर्त टेनिसरसिकांना प्रतीक्षा आहे, एखाद्या नवीन ग्रँड स्लॅम विजेत्याची.
सौजन्य – लोकप्रभा