कॉर्पोरेट चषकादरम्यान सामनाधिकाऱ्यांचा अहवाल
अगदी काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा घटक असलेल्या मध्यमगती गोलंदाज प्रवीण कुमारचे मानसिक संतुलन ढळल्याचा अहवाल बीसीसीआयला सादर करण्यात आला आहे.
रायपूर येथे सुरू असलेल्या कॉर्पोरेट चषकाच्या ओएनजीसी आणि इन्कम टॅक्स यांच्या दरम्यानच्या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला उद्देशून प्रवीण कुमारने अपशब्द उच्चारले. या प्रकरणाची सुनावणी सामनाधिकारी धनंजय सिंग यांच्यासमोर झाली आणि त्यांनी बीसीसीआयला दिलेल्या अहवालात प्रवीण मानसिकदृष्टय़ा ठीक नसल्याचे म्हटले आहे.
ओएनजीसीतर्फे खेळणाऱ्या प्रवीणने फलंदाज अजितेश अरगलला आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. हा चेंडू नो-बॉल आहे का? याची अजितेशने पंचांकडे विचारणा केली. यामुळे भडकलेल्या प्रवीणने अजितेशला उद्देशून अपशब्द उच्चारले. मैदानावरील पंचांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. प्रवीणने लेव्हल-२ आणि ४ नियमांचा भंग केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे याआधीच्या सामन्यातही प्रवीणचे प्रेक्षकांबरोबर भांडण झाले होते. या प्रकारामुळे स्थानिक संघटनेला त्या सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करावी लागली. प्रवीणवर यासंदर्भात कारवाई करणार का? हा प्रश्न बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नाकर शेट्टी यांना विचारले असता, त्यांनी हा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगितले.