नवी दिल्ली : क्रिकेटसारख्या कठीण खेळात मानसिक आरोग्य उत्तम राखणे, हे सर्वात मोठे आव्हान असते. व्यग्र वेळापत्रक आणि भविष्याची अनिश्चिती या चिंतेवर मात करण्यासाठी खेळाडूंपुढे मानसिक आरोग्याचा समतोल राखणे महत्त्वाचे असते, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले.

संघातून वगळल्यानंतरचा काळ हा कठीण असतो, असे मत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संचालकपद भूषवणाऱ्या द्रविडने व्यक्त केले. ‘‘क्रिकेटसारख्या खेळात संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते. त्यामुळे दडपणाचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे संधीची प्रतीक्षासुद्धा बरीच करावी लागते,’’ असे द्रविडने सांगितले.

‘‘मैदानावर आणि मैदानाबाहेर खेळाडूला स्वत:कडे लक्ष देण्याची गरज असते. यशाचा आनंद आणि अपयशाचे दु:ख याचा योग्य समतोल साधण्याची नितांत आवश्यकता असते. याच प्रकारचे समतोल आयुष्य मला जगता आले,’’ असे द्रविडने सांगितले.