नवी दिल्ली : गेली चार ते पाच वर्षे सातत्याने क्रिकेट खेळल्यामुळे माझे मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा खच्चीकरण झाले. त्यामुळेच मला अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने दिली.

३१ वर्षीय मॅक्सवेलने ऑक्टोबर महिन्यात मायदेशात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून मध्यातच माघार घेतली होती. मानसिक आरोग्याशी निगडित समस्या जाणवल्यामुळे माघार घेणारा मॅक्सवेल आता मात्र पुनरागमनासाठी सज्ज झाला असून १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बिग बॅश लीग या स्थानिक स्पर्धेत मॅक्सवेल मेलबर्न स्टार्स संघाचे नेतृत्व करणार आहे.

‘‘ज्या दिवशी मी विश्रांती घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापूर्वीच अनेक दिवसांपासून माझ्या मनात हा विचार घोळत होता. या विश्रांतीमागील मुख्य कारण म्हणजे माझे मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा झालेले खच्चीकरण होते,’’ असे मॅक्सवेलने सांगितले.

‘‘सर्व सामान बॅगेत भरून किमान चार-पाच वर्षे दूर निघून जाण्याचा विचार गेली आठ महिने सातत्याने माझ्या मनात यायचा. अखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत या विचारांना आळा घालणे मला अशक्य झाले. सततच्या क्रिकेटमुळेच हे घडले असावे,’’ असेही मॅक्सवेलने सांगितले.

‘‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया, क्रिकेट व्हिक्टोरिया आणि मेलबर्न स्टार्स या संघांनी या काळात मला पाठिंबा दिल्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे. त्याशिवाय माझ्या प्रेयसीनेही माझ्यातील ही समस्या सर्वप्रथम जाणून मला सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी आज पुनरागमन करू इच्छितो,’’ असे मॅक्सवेलने सांगितले.