News Flash

ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी राष्ट्रे शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात स्त्री-पुरुष समानता आणि वांशिक न्याय या सामाजिक विषयांना आपला पाठिंबा दर्शवतील.

वृत्तसंस्था, टोक्यो

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी राष्ट्रे शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात स्त्री-पुरुष समानता आणि वांशिक न्याय या सामाजिक विषयांना आपला पाठिंबा दर्शवतील. पुरुष आणि महिला दोघांनाही समान स्थान देणारे हे पहिलेच ऑलिम्पिक असेल. त्यामुळे प्रत्येक देशाकडून एक पुरुष आणि एक महिला असे दोन ध्वजवाहक नेमण्यात आले आहेत.

टोक्यो शहरामधील शिंजुकू भागातील न्यू नॅशनल स्टेडियमवर एक वर्ष आणि एक दिवस उशिराने यंदाच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेचा प्रारंभ शुक्रवारी शानदार उद्घाटन सोहळ्याने होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमी वर सर्वाच्या अपेक्षेपेक्षा यंदाचे ऑलिम्पिक वेगळे असेल.

महिन्याभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना ऑलिम्पिकसाठी बंदी घातली, तर आठवडय़ाआधी जपानमध्ये आणीबाणी लागू करून स्थानिक प्रेक्षकांनाही मज्जाव करण्यात आला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक देशाचे मर्यादित क्रीडापटू या सोहळ्याला हजर राहतील. करोनाचे आव्हान आणि पुढील दिवशीची स्पर्धा यामुळे प्रत्येक देशाचे मर्यादित क्रीडापटू संचलनात सहभागी होती.

ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात औपचारिक कार्यक्रमासह जपानी इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर संचलन, ऑलिम्पिक गीताचे सादरीकरण आणि ऑलिम्पिक शपथ खेळाडू घेतील. याचप्रमाणे ऑलिम्पिक ज्योतसुद्धा मैदानावर आणली जाईल.

ऑलिम्पिकच्या पूर्वसंध्येला १९७९ रुग्ण

ऑलिम्पिकच्या पूर्वसंध्येला सहा महिन्यांतील सर्वोच्च करोनाबाधितांची रुग्णसंख्या गुरुवारी नोंदली गेली. १५ जानेवारी रोजी २०४४ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर गुरुवारी १९७९ रुग्णांची नोंद झाली आहे. आणीबाणी लागू करून ऑलिम्पिकच्या आयोजनाचा निर्धार पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी १२ जुलैला जाहीर केला. परंतु त्यानंतर शहरातील रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे.

दोन खेळाडूंची करोनामुळे माघार

चेक प्रजासत्ताकची व्हॉलीबॉलपटू मार्केटा नॉश्च तसेच नेदरलँड्सची तायक्वांडोपटू रेश्मी ओगिनक या दोघींना करोनाची लागण झाल्यामुळे ऑलिम्पिकमधून माघार घ्यावी लागली आहे. ऑलिम्पिक नगरीत आता करोनाची बाधा झालेल्यांची संख्या १०वर पोहोचली आहे. चेक प्रजासत्ताक संघातील तीन खेळाडू आणि एका प्रशिक्षकाला तर नेदरलँड्सच्या दुसऱ्या खेळाडूला करोनाची लागण झाली आहे.

ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करून संपूर्ण विश्वाला आशेचा किरण दाखवण्यासाठी आम्ही आतुर आहोत. इथपर्यंतची वाटचाल खडतर होती. मात्र ऑलिम्पिकला प्रारंभ झाल्यावर सगळी काही सुरळीतपणे होईल, याची खात्री आहे.

– थॉमस बाख, ‘आयओसी’चे अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 3:02 am

Web Title: message gender equality from the olympic opening ceremony ssh 93
Next Stories
1 उद्घाटनासाठी भारताचे फक्त २८ जणांचे पथक
2 भारतीय संघात बदल अपेक्षित?
3 तिहार जेलमध्ये सुशील कुमारला मिळणार टीव्ही; टोक्यो ऑलिम्पिकसाठी केलेली मागणी मान्य!