माद्रिद : तीन महिन्यांनंतर स्पेनमधील ला-लिगा फुटबॉलला सुरुवात झाल्यानंतर अव्वल खेळाडू लिओनेल मेसीच्या गोलसह बार्सिलोना संघाने दमदार पुनरागमन केले आहे. बार्सिलोनाने तीन महिन्यांनंतर पहिली लढत खेळताना मॅर्लोकावर ४-० सहज मात केली. याबरोबरच बार्सिलोनाने २८ सामन्यांतून ६१ गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले.

गेल्या आठवडय़ात पायाच्या दुखापतीमुळे मेसीच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र त्यातून दमदार पुनरागमन करत मेसीने मॅर्लोकाविरुद्ध गोल तर केलाच, पण बार्सिलोनासाठी आणखी दोन गोल व्हायला मदत केली. खेळ संपायला काही मिनिटे बाकी असताना मेसीने गोल केला. मात्र त्याआधी बार्सिलोनाकडून अर्टुरो विडालने दुसऱ्या मिनिटाला गोल केला. त्यापाठोपाठ मेसीने मार्टिन ब्रेथवेटला ३७व्या आणि जोर्डी अल्बाला ७९व्या मिनिटाला गोल करण्यासाठी मदत केली. मॅर्लोका ला-लिगामधील २० संघांमध्ये १८व्या स्थानी असून पुढील हंगामात स्थान टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. बार्सिलोनाकडे दुसऱ्या स्थानावरील रेयाल माद्रिदपेक्षा पाच गुणांची आघाडी अधिक आहे.

खेळाडूंची मिठी

यंदाच्या ला-लिगामध्ये सामाजिक अंतर ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आलेले असतानाही खेळाडू ते गंभीरपणे घेत नसल्याचे दिसले आहे. सेव्हिलाच्या गुरुवारी झालेल्या सामन्यात खेळाडूंनी गोल केल्यावर एकमेकांना आलिंगन दिले. बार्सिलोनाच्या लढतीतही तेच घडले.

..तरीही चाहता मैदानात

करोनामुळे प्रेक्षकांशिवाय ला-लिगा खेळण्यात येत असली तरीदेखील बार्सिलोनाच्या लढतीत मेसीसोबत छायाचित्र काढायचे असल्याने एक चाहता मैदानात घुसला. मैदानात घुसल्यावर मेसीसह काही खेळाडूंसोबत अंतर राखत त्याने ‘सेल्फी’ काढला. अखेर सुरक्षारक्षकांनी वेळीच त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र ला-लिगा व्यवस्थापन समितीने मैदानात घुसणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.