ला लीगा फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोलांचा विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या लिओनेल मेस्सीला आता चॅम्पियन्स लीग स्पर्धेतही हाच विक्रम खुणावत आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेत बार्सिलोनाचा सामना मंगळवारी अजाक्सशी होणार आहे.
तीन आठवडय़ांपूर्वी मेस्सीच्या दोन गोलांच्या बळावर बार्सिलोनाने अजाक्सवर २-० असा विजय मिळवला होता. या कामगिरीसह मेस्सीने चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या रिअल माद्रिदच्या राउल यांच्या ७१ गोलांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. हा विक्रम मोडीत काढून बार्सिलोनाने बाद फेरीत स्थान मिळवून देण्याचे मेस्सीचे उद्दिष्ट आहे.
रविवारी झालेल्या ला लीगामधील सामन्यात मेस्सीच्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोनाने सेव्हिलावर ५-१ अशी मात केली होती. मेस्सीला पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देत बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुइस एन्रिके म्हणाले, ‘‘मेस्सीसारखा अफाट गुणवत्ता लाभलेला महान खेळाडू संघात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्याकडून यापुढेही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.’’ बार्सिलोनाचा आंद्रेस इनियेस्टा आणि थॉमस वर्माएलेन यांनी दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतली आहे.