लिओनेल मेसी याने दोन गोल झळकावत गिरोनाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात बार्सिलोनाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. बार्सिलोनाने हा सामना ३-१ अशा फरकाने जिंकला.

लुइस सुआरेझ आणि आर्टुरो विदाल या दोन अव्वल खेळाडूंना प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी विश्रांती दिली होती. गेल्या मोसमात एकही जेतेपद न पटकावलेला बार्सिलोना क्लब सोडण्याची धमकी मेसीने दिली होती. मात्र त्यानंतर बार्सिलोनासोबतच राहण्याचे ठरवल्यानंतर या मोसमाच्या पूर्वतयारीच्या सामन्यात दोन गोल करून (४५व्या व ५१व्या मिनिटाला) मेसीने झोकात पुनरागमन केले. फिलिपे कु टिन्होने २१व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाच्या विजयात योगदान दिले. गिरोनाकडून सॅम्युएल सेझने एकमेव गोल केला.

चाहत्यांना प्रवेश नाहीच

म्युनिक : बुंडेसलीगाच्या मोसमाला शुक्रवारपासून प्रारंभ होत असून बायर्न म्युनिकच्या शाल्के विरुद्ध होणाऱ्या सलामीच्या सामन्याला प्रेक्षकांना प्रवेश नाकारला आहे.

पॅरिस सेंट-जर्मेनचा विजय

पॅरिस : ज्युलियन ड्रॅक्सलरने भरपाई वेळेत (९३व्या मिनिटाला) हेडरवर केलेल्या एकमेव गोलमुळे पॅरिस सेंट-जर्मेनने लीग-१ फुटबॉलमध्ये मेट्झ संघावर १-० असा विजय मिळवला.