बार्सिलोनाच्या प्रशिक्षकांसह पाच जणांचा गौरव

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या (फिफा) प्रतिष्ठित बॅलोन डी’ओर पुरस्काराचा प्रबळ दावेदार असलेल्या बार्सिलोना क्लबच्या लिओनेल मेस्सीने मंगळवारी ला लीगा फुटबॉल स्पध्रेच्या गतसत्रातील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला. रिअल माद्रिदचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कुरघोडी करीत मेस्सीने मागील सात हंगामांतील सहाव्या पुरस्कारावर नाव कोरले. सर्वोत्तम खेळाडूसह मेस्सीने सर्वोत्तम आघाडीपटूचा पुरस्कारही जिंकला.
२०१४-१५ या हंगामात मेस्सीने ४३ गोल्स केले असून बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग, ला लीगा आणि स्पॅनिश चषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्या बळावर या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली. ‘‘ला लीगा स्पध्रेतील अनेक महत्त्वाच्या खेळाडूंसमोर हा पुरस्कार स्वीकारताना अभिमान वाटतो,’’ अशी प्रतिक्रिया मेस्सीने पुरस्कार स्वीकारताना दिली. तो म्हणाला, ‘‘हा पुरस्कार माझा तीन वर्षांचा मुलगा थिआगोला समर्पित करतो, जरी त्याला फुटबॉल फारसे कळत नसले तरी. स्पध्रेकरिता मी घरातून बाहेर पडतो, त्या वेळी तो माझ्यावर रागावतो आणि विचारतो, ‘पप्पा, तुम्ही पुन्हा गोल करायला जात आहात?’ त्यामुळे हा पुरस्कार त्याच्यासाठी आहे.’’

पुरस्कारांवर बार्सिलोनाची छाप : ला लीगा २०१४-१५ या हंगामातील नऊपैकी पाच पुरस्कार हे बार्सिलोनाच्या खेळाडूंनी पटकावले. बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुइस एन्रिक यांना सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात आले, तर क्लाउडिओ ब्राव्हो (सवरेत्कृष्ट गोलरक्षक), नेयमार (सवरेत्कृष्ट अमेरिकन खेळाडू) आणि मेस्सी (सवरेत्कृष्ट आघाडीपटू) बार्सिलोनाच्या या खेळाडूंना सत्कार करण्यात आला. बचावपटू म्हणून रिअल माद्रिदच्या सेर्गिओ रॅमोस, तर मध्यरक्षक म्हणून माद्रिदच्याच जेम्स रॉड्रिगेजचा गौरव झाला. आफ्रिकन खेळाडू म्हणून व्हॅलेंसिआच्या सोफिअ‍ॅने फेघोउलीला सन्मानित केले.