डेव्हिड व्हिला आणि लिओनेल मेस्सी यांच्या सुरेख कामगिरीमुळे बार्सिलोनाने रायो व्हॅलेकानो संघाचा ३-१ असा सहज पराभव केला. या विजयामुळे बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत १३ गुणांसह आपली आघाजी मजबूत केली आहे.
झावी हेर्नाडेझ, कालरेस प्युयोल आणि विक्टर वाल्डेस या दुखापतग्रस्त खेळाडूंविना खेळणाऱ्या बार्सिलोनाची भिस्त व्हिला आणि मेस्सी यांच्यावरच होती. व्हिलाने एक गोल करून दोन गोल रचण्यात महत्त्वाचा वाटा उचलला तर मेस्सीने दोन गोल करून संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. २५व्या मिनिटाला व्हिलाने बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर मेस्सीने ४०व्या आणि ५७व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रायो व्हॅलेकानोतर्फे राऊल टामूडोने एकमेव गोल झळकावला.
फ्रँक लॅम्पर्डचा २००वा गोल
लंडन : फ्रँक लॅम्पर्डने चेल्सीकडून खेळताना २००वा गोल झळकाविल्यामुळे चेल्सीने वेस्ट हॅम युनायटेडवर २-० असा विजय मिळवून इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. फुलहॅमकडून टॉटनहॅम हॉट्सपरला
१-० असे पराभूत व्हावे लागल्याने चेल्सीला तिसऱ्या स्थानी मजल मारण्याची संधी मिळाली. चेल्सीकडून लॅम्पर्डने १९व्या तर इडेन हजार्डने ५०व्या मिनिटाला गोल केला.
ज्युवेंट्सची जेतेपदाच्या दिशेने कूच
मिलान : ज्युवेंट्स संघाने बोलोग्नाचा २-० असा सहजपणे पराभव करून सेरी ए फुटबॉल स्पर्धेत जेतेपदाच्या दिशेने कूच केली
आहे. ज्युवेंट्स संघ ६५ गुणांसह आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावरील नापोली संघ त्यांच्यापेक्षा नऊ गुणांनी मागे आहे. अन्य सामन्यांत, एसी मिलान संघाने पलेर्मोवर २-० अशी मात केली.