ला लिगा फुटबॉल

बार्सिलोनाची सलग दुसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल

विश्वातील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून लोकप्रिय असलेल्या लिओनेल मेसीने सर्वोत्तम लयीत असल्यास आपण काय पराक्रम करू शकतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा तमाम फुटबॉलप्रेमींना घडवला. रविवारी मध्यरात्री ला लिगा फुटबॉलमध्ये मेसीच्या हॅट्ट्रिकमुळेच बार्सिलोनाने रेयाल बेटिसवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला.

या विजयाबरोबरच बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉल लीगच्या सलग दुसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे. २८ सामन्यांतून २० विजय, दोन पराजय आणि सहा बरोबरींसह त्यांचे एकूण ६६ गुण झाले आहेत. बार्सिलोनाचे अद्याप १० सामने बाकी आहेत. दुसऱ्या स्थानावरील अ‍ॅटलेटिको माद्रिदपेक्षा (२८ सामन्यांतून ५६ गुण) ते १० गुणांनी पुढे आहेत. मेसीला लुइस सुआरेझने एक गोल झळकावत सुरेख साथ दिली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच चेंडूवर ताबा मिळवत बार्सिलोनाने रेयाल बेटिसच्या बचावपटूंवर दडपण आणले. १८व्या मिनिटाला फ्री किक्वर मेसीने बार्सिलोनासाठी पहिला गोल नोंदवला. मध्यांतरापर्यंत बार्सिलोनाने १-० अशी घाडी कायम राखण्यात यश मिळवले.

मध्यांतरानंतर लगेचच दुसऱ्या (४७व्या) मिनिटाला मेसीने सुआरेझच्या पासवर दुसरा गोल झळकावला. ६३व्या मिनिटाला सुआरेझनेदेखील तब्बल २५ यार्डावरून वैयक्तिक पहिला गोल करीत बार्सिलोनाला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

लोरेन मोरोनने ८२व्या मिनिटाला रेयाल बेटिससाठी एकमेव गोल नोंदवून पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हॅट्ट्रिकसाठी उत्सुक असलेल्या मेसीने ८५व्या मिनिटाला वैयक्तिक तिसरा व संघासाठी चौथा गोल झळकावत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चौथा गोल झळकावताच स्टेडियममधील सर्व प्रेक्षकांनी मेसीला उभे राहून मानवंदना दिली. बार्सिलोनाचा पुढील सामना शनिवारी इस्प्यान्योलविरुद्ध होणार आहे.

दरम्यान सुआरेझला या सामन्यात उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला यातून सावरण्यासाठी किमान दोन आठवडय़ांचा काळ लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या चीन चषकामधील उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीत सुआरेझ उरुग्वेचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही.

४यंदाच्या हंगामातील मेसीची ही चौथी, ला लिगामधील ३३वी, तर कारकीर्दीतील तब्बल ५१वी हॅट्ट्रिक ठरली.

२९यंदाच्या क्लबस्तरीय स्पर्धामध्ये नोंदवलेल्या ३९ गोलपैकी २९ गोल मेसीने ला लिगामध्येच झळकावले आहेत.

यापूर्वी मला चाहत्यांकडून अशा प्रकारची मानवंदना कधीच मिळाली नव्हती. रेयाल बेटिसचा बचाव भक्कम आहे, त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध लगावलेल्या या हॅट्ट्रिकमुळे मी फार आनंदी आहे. संघातील सर्वच खेळाडूंना सलग दुसऱ्या विजेतेपदाची चाहूल लागली आहे.

– लिओनेल मेसी, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू