ला लिगा  फुटबॉल

बार्सिलोनाच्या लिओनेल मेसीने २०१९ या वर्षांची सांगता अपेक्षेप्रमाणेच दणक्यात केली. मेसीने साकारलेल्या वर्षांतील ५०व्या गोलला (अर्जेटिना+बार्सिलोना मिळून) लुईस सुआरेझ, अ‍ॅन्टोइन ग्रीझमन आणि अर्टुरो विडाल यांच्या प्रत्येकी एका गोलची अप्रतिम साथ लाभल्यामुळे बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलमध्ये शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात अ‍ॅलेव्हसला ४-१ अशी धूळ चारली.

‘फिफा’चा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार, विक्रमी सहाव्यांदा ‘बलोन डी ऑर’ला गवसणी आणि सर्वाधिक ३५ हॅट्ट्रिकसह यापूर्वीच या वर्षांवर छाप पाडणाऱ्या ३२ वर्षीय मेसीने ६९व्या मिनिटाला तब्बल २५ यार्डाहून लांब चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवून बार्सिलोनाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

त्यापूर्वी ग्रीझमन आणि विडाल यांनी अनुक्रमे १४ व्या आणि ४५व्या मिनिटाला गोल झळकावून बार्सिलोनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. सुआरेझने ७५व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे चौथा गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अ‍ॅलेव्हसतर्फे पेरी पॉन्सने (५६) एकमेव गोल केला.

या विजयामुळे गुणतालिकेत अग्रस्थानी असणाऱ्या बार्सिलोनाच्या खात्यात १८ सामन्यांतून ३९ गुण जमा असून वर्षांखेरीस तेच अग्रस्थानावर कायम राहण्याची शक्यता आहे. रेयाल माद्रिद १७ लढतींतून ३६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

१३ मेसीने ला लिगाच्या यंदाच्या हंगामात १३ सामन्यांतून सर्वाधिक १३ गोल केले आहेत. तसेच गेल्या १० पैकी नऊ वर्षांत त्याने गोल अर्धशतक साकारले.

८ आठ वर्षांनंतर प्रथमच बार्सिलोनाने संपूर्ण वर्षांत मायदेशात एकही सामना गमावला नाही. कॅम्प नाऊ येथे झालेल्या २८ सामन्यांपैकी २४ सामन्यांत बार्सिलोनाने विजय मिळवले, तर चार सामने बरोबरीत सुटले.

३ विविध स्पर्धेतील गेल्या १५ सामन्यांपैकी ३ सामन्यांत मेसी, सुआरेझ आणि ग्रीझमन या त्रिमूर्तीने गोल केला आहे. तर, तब्बल आठ लढतींमध्ये या तिघांपैकी एकाने किमान एक गोल बार्सिलोनाच्या विजयात झळकावला आहे.