ला लिगा फुटबॉल

बार्सिलोनाचा मातब्बर फुटबॉलपटू लिओनेल मेसीसाठी २०१९ हे वर्ष चांगलेच फलदायी ठरत आहे. सहा ‘बलोन डी ओर’ विजेत्या मेसीने साकारलेली विक्रमी हॅट्ट्रिक आणि अ‍ॅन्टोइन ग्रीझमन, लुईस सुआरेझ यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर बार्सिलोनाने रविवारी ला लिगा फुटबॉलमध्ये रियल मालोर्का संघाचा ५-२ असा पराभव केला.

कॅम्प नाऊ येथे झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच बार्सिलोनाच्या मेसी, ग्रीझमन आणि सुआरेझ या त्रिमूर्तीने वर्चस्व गाजवले. ७व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून ग्रीझमनने बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. तर मेसीने अनुक्रमे १७, ४१ आणि ८३व्या मिनिटाला गोल झळकावून ला लिगामधील ३५वी हॅट्ट्रिक साकारली. त्याने ३४ हॅट्ट्रिक करणाऱ्या युव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकले.  सुआरेझने ४३व्या मिनिटाला गोल करून यंदाच्या हंगामातील चौथा गोल केला. अँटे बुदिमिरने ३५ आणि ६४व्या मिनिटाला मालोर्कासाठी दोन गोल केले. परंतु संघाला विजयी करण्यासाठी त्याचे प्रयत्न अपुरे पडले.अग्रस्थानावरील बार्सिलोनाच्या नावावर सध्या १५ सामन्यांतील ११ विजयांसह ३४ गुण असून रेयाल माद्रिद तितक्याच गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. गोलफरकांच्या सरासरीमुळे बार्सिलोनाने अग्रस्थान टिकवले आहे.

मेसीने यंदाच्या ला लिगामध्ये आतापर्यंत ४ हॅट्ट्रिक नोंदवल्या आहेत. त्याशिवाय या हंगामातील १० सामन्यांत त्याच्या नावावर १२ गोल जमा आहेत.

बार्सिलोनाने घरच्या मैदानावर मालोर्काविरुद्ध मिळवलेला हा सातवा विजय ठरला. मे २००८मध्ये मालोर्काने बार्सिलोनाला अखेरचे पराभूत केले होते.

रोनाल्डोच्या गोलनंतरही युव्हेंटस पराभूत

तुरिन (इटली) : ख्रिस्तियानो रोनाल्डोने २५व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलनंतरही गतविजेत्या युव्हेंटसला सेरी ए फुटबॉल लीगमध्ये पहिल्याच पराभवाला सामोरे जावे लागले. लुइस रामोस, सर्गेज मिलानकोव्हिच आणि फेलिप कॅसिडो यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर लॅझिओ संघाने युव्हेंटसचा ३-१ असा पराभव केला. त्यामुळे तूर्तास १५ सामन्यांतील ३६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या युव्हेंटसला इंटर मिलानकडून (१५ सामन्यांत ३८ गुण) अग्रस्थान पटकावण्यासाठी खेळ उंचवावा लागणार आहे.