अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेसीने क्लब आणि देशाकडून खेळताना मिळून ७००वा गोल साजरा केला. मात्र तरीदेखील बार्सिलोनाला ला-लिगा फुटबॉलमध्ये अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या लढतीत २-२ अशी बरोबरी पत्करावी लागली. याबरोबरच बार्सिलोनाच्या ला-लिगा जेतेपद पटकावण्याच्या  आशांना फटका बसला आहे.

बार्सिलोनाची ही गेल्या चार सामन्यांतील तिसरी बरोबरी आहे. या बरोबरीमुळे बार्सिलोनाला अव्वल स्थानी असलेल्या रेयाल माद्रिदपेक्षा एका गुणाची पिछाडी पत्करावी लागली आहे. बार्सिलोना दुसऱ्या स्थानी आहे. मात्र वैयक्तिक स्तरावर नेहमीप्रमाणे सरस कामगिरी करत मेसीने बार्सिलोनाकडूनचा ६३०वा गोल साजरा केला. अर्जेटिनाकडून त्याने ७० गोल केले आहेत. ला-लिगा हंगामातही सर्वाधिक २२ गोल हे मेसीच्याच नावावर आहेत.

७ ७०० गोल करणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवणारा मेसी हा सातवा खेळाडू ठरला. याआधी गर्ड मुलेर, फेरेन्क पुस्कास, पेले, रोमारियो आणि जोसेफ बिकान या माजी फुटबॉलपटूंनी ७०० हून अधिक गोल केले आहेत. सध्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डोचे ७४६ गोल आहेत.