मेक्सिको संघाने सोमवारी ७० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने सातव्यांदा सुवर्ण चषक फुटबॉल स्पध्रेचे जेतेपद पटकावले. मेक्सिकोने पहिल्यांदाच या स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जमैका संघाचा ३-१ असा पराभव केला.
उत्तर व दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन संघांचा समावेश असलेल्या या स्पध्रेत जमैकाच्या रूपाने पहिल्यांदाच कॅरेबियन संघाने अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम गाजवला़, परंतु त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. ३१व्या मिनिटाला कर्णधार अँड्रेस गुआर्डाडोने गोल करून मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ ४७व्या मिनिटाला जिसस कोरोना आणि ६१व्या मिनिटाला ऑरिबे पेराल्टाने गोल करून ती आघाडी ३-० अशी भक्कम केली. जमैकाकडून ८०व्या मिनिटाला डॅरेन मॅटॉक्सने एकमेव गोल केला. अखेरीस मेक्सिकोने ३-१ अशा फरकाने जेतेपद पटकावले.