विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यामुळे क्रोएशियन फुटबॉलरसिकांच्या दु:खाला पारावार नाही. मेक्सिकोकडून ३-१ अशा फरकाने हार पत्करल्यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे. अनुभवी कर्णधार राफेल माक्र्वेझ हा मेक्सिकोच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ‘अ’ गटातून ब्राझील आणि मेक्सिको हे दोन संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
क्रोएशियामधील हॉटेल्स, चौक, आदी महत्त्वाच्या ठिकाणी साऱ्यांनीच या सामन्यासाठी मोठी गर्दी केली होती. क्रोएशियाचा संघ साखळीतील अखेरचा सामना जिंकून आपले आव्हान टिकवेल, अशी त्यांना आशा होती. परंतु दुसऱ्या सत्रातील फक्त दहा मिनिटांत मेक्सिकोने नोंदवलेल्या तीन गोलमुळे क्रोएशियाच्या आशा मावळल्या. माक्र्वेझने ७२व्या मिनिटाला गोल झळकावून मेक्सिकोचे खाते उघडले. मग आंद्रेस गुर्दादोने ७५व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला आणि त्यानंतर ८२व्या मिनिटाला बदली खेळाडू जेव्हियर हर्नाडीझने तिसऱ्या गोलची नोंद केली. आता फोर्टालीझा येथे रविवारी बाद फेरीत मेक्सिकोची गाठ पडेल ती नेदरलँड्सशी. गुर्दादोच्या दुसऱ्या गोलनंतर क्रोएशियामधील टीव्हीवर ‘स्वप्नांना निरोप’ असे भाष्य करण्यात आले होते. परंतु सामना संपल्याची शिट्टी रेफ्रीनी वाजवण्यापूर्वी काही मिनिटे आधी इव्हान पेरिसिकने क्रोएशियाच्या गुणफलकावर पहिला गोल झळकावला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 2:14 am