गतविजेत्या नवमहाराष्ट्र संघाने सांगलीच्या हिंदकेसरी संघावर १३-१२ असा पराभव करीत महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेतील पुरुष गटात विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली. तथापि, मध्यंतराला एक गुणाने पिछाडीवर असलेल्या ठाण्याच्या नाईक विद्यामंदिर संघाने ठाण्याच्याच शिवभक्त संघावर ८-७ अशी मात करीत महिलांचे विजेतेपद मिळविले.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत  पुरुष गटात नवमहाराष्ट्र संघाने पूर्वार्धात ८-७ अशी आघाडी मिळविली होती. त्यांचा विजयात मुकेश गोसावी (१ मि.४० सेकंद, १मि.१० सेकंद, व ५ गडी), सुयश गरगटे (दोन गडी व दोन्ही डावात १ मि. ४० सेकंद), मयुरेश साळुंके (दोन्ही डावात प्रत्येकी दोन मिनिटे) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. हिंदकेसरी संघाकडून युवराज जाधव (१ मि २० सेकंद, २ मिनिटे व ५ गडी), मिलिंद चावरेकर (दोन्ही डावात प्रत्येकी १ मि.४० सेकंद) यांची लढत अपुरी ठरली. मुंबई उपनगरच्या गांधी स्पोर्ट्स क्लबने तिसरे स्थान मिळवताना वाळवा येथील नायकवडी युवा मंच संघावर १३-१२ अशी मात केली.
महिलांमध्ये नाईक विद्यामंदिर संघ मध्यंतराला ३-४ असा पिछाडीवर होता, मात्र मध्यंतरानंतर त्यांनी धारदार आक्रमण व सुरेख पळती असा खेळ करत विजयश्री खेचून आणली. त्यांच्याकडून शीतल भोर (दीड मिनिट व ३ मिनिटे ५० सेकंद), पूजा डांगे (२ मि.१० सेकंद व दोन मिनिटे), दीक्षा कदम (दोन गडी व नाबाद १ मि.५० सेकंद) यांनी सुरेख पळतीचा खेळ केला. शिवभक्त संघाच्या प्रियंका भोपीने पहिल्या डावात ४ मिनिटे ४० सेकंद व दुसऱ्या डावात २ मिनिटे ४० सेकंद असा तर कविता घाणेकरने (१मि.४० सेकंद व १ मि.२० सेकंद) असा खेळ केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उस्मानाबादच्या छत्रपती क्रीडा संघाने साखरवाडी क्रीडा संघ (सातारा) यांचा १५-१३ असा अलाहिदा डावानंतर पराभव केला. पूर्ण वेळेत हा सामना १०-१० असा बरोबरीत राहिला होता.
पुरुष विभागात युवराज जाधव (आक्रमण), मयुरेश साळुंके (संरक्षण) व मुकेश गोसावी (अष्टपैलू) सर्वोत्तम ठरले. तर महिला विभागात हा मान अनुक्रमे शीतल भोर (आक्रमण), पौर्णिमा सकपाळ (संरक्षण) व प्रियंका भोपी (अष्टपैलू) यांनी मिळविला.