जोशमध्ये खेळताना होश विसरायचा नसतो, दोन्ही संघांमधली खुन्नस, ठस्सन, एकमेकांवर चाल करणारे खेळाडू यामध्ये मैदानातील ज्वर चढलेलाच होता. पण यामध्ये होश कायम ठेवत मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १८७ धावा फटकावल्या, या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १६८ धावा करता आल्या आणि मुंबईने १९ धावांनी विजय मिळवला.
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने पवन सुयालच्या तिसऱ्या षटकात गेलच्या प्रत्येकी २ चौकार आणि षटकारांसह २८ धावा लूटल्या. अर्धशतकी सलामीनंतर गेल (३८) आणि कोहली (३५) यांनी संघाचा डाव सावरला, पण गेल बाद झाल्यावर बंगळुरूच्या डावाला उतरती कळा लागली आणि ते विजयापासून दूर गेले.
तत्पूर्वी बंगळुरूने नाणेफक जिंकत मुंबईला फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांनी १८७ धावा फटकावल्या. दहाव्या षटकामध्ये मुंबईने ४ फलंदाज गमावत ८४ धावा केल्या होत्या. या स्थितीमध्ये रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांनी संघाला सावरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६० चेंडूंमध्ये ९७ धावांची भागीदारी रचली. रोहितने वरूण आरोनच्या १९ षटकांत ३ षटकारांसह २४ धावांची लूट करत अर्धशतक साजरे केले, त्याने ३५ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर नाबाद ५९ धावांची अप्रतिम खेळी साकारली.  दुसरीकडे बंगळुरूवर खुन्नस काढत पोलार्डने ६ चौकारांच्या जोरावर ४३ धावा फटकावल्या. बंगळुरूने यावेळी २५ अवांतर धावा आंदण दिल्या.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ५ बाद १८७ (रोहित शर्मा नाबाद ५९, किरॉन पोलार्ड ४३; हर्षल पटेल १/२८) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ८ बाद १६८. (ख्रिस गेल ३८, विराट कोहली ३५; जसप्रीत बुमरा २/२२).

स्टार्क-पोलार्डची जुंपली
सामन्याच्या १८व्या षटकांत पोलार्डने काही कारणास्तव चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला खरा, पण मिचेल स्टार्कने त्याच्या दिशेने चेंडू फेकून मारला. हे पाहिल्यावर पोलार्डचा पारा चढला आणि त्यानेही बॅट भिरकावली. मैदानाततले हे तळपते दंद्व अखेर पंचांनी मिटवले.

आयपीएलमधून झहीरची माघार
मुंबई : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज झहीर खान दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत झहीरच्या मांडीला दुखापत झाली होती.