कुठल्याही स्थितीतून पुनरागमन करणे हे ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या खेळाचे वैशिष्टय़. दुसऱ्या कसोटीत ५ बाद २७३ वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५७० धावांची मजल मारली. या मोठय़ा धावसंख्येचे शिल्पकार ठरले कर्णधार मायकेल क्लार्क आणि यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिन. अ‍ॅडलेडच्या खेळपट्टीवर अफलातून कामगिरी नावावर असणाऱ्या क्लार्क-हॅडिन जोडीने सहाव्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थिती गाठून दिली.
क्लार्कने पाचवी अ‍ॅशेस कसोटी खेळताना तिसऱ्या शतकाची, तर एकूण २६व्या शतकाची नोंद केली. अ‍ॅडलेडच्या मैदानावरचे क्लार्कचे हे सहावे कसोटी शतक ठरले. दुसरीकडे यंदाच्या वर्षांत फॉर्मसाठी झगडणाऱ्या हॅडिनने तीन वर्षांनंतर कसोटी शतक झळकावले. क्लार्कने १७ चौकारांसह १४५ धावांची खेळी साकारली, तर हॅडिनने ११ चौकार आणि ५ षटकारांसह ११८ धावा केल्या. रायन हॅरिसने नाबाद ५५ करून इंग्लंडच्या गोलंदाजांना नामोहरम केले. इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ३ बळी टिपले. या दोघांच्या मॅरेथॉन भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ९ बाद ५७० धावांवर आपला डाव घोषित केला.
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या तेजतर्रार माऱ्यासमोर भंबेरी उडालेल्या इंग्लंडची या कसोटीतही डळमळीत सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला झटपट माघारी धाडत मिचेल जॉन्सनने ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. कुकने केवळ ३ धावा केल्या. यानंतर मायकेल कारबेरी आणि ट्रॉटच्या माघारीमुळे तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला जो रुट यांनी संयमी खेळ करत पडझड थांबवली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या १ बाद ३५ धावा झाल्या आहेत. कारबेरी २०, तर रुट ९ धावांवर खेळत आहे.