भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार शेन वॉटसन नक्की भारतात परतेल, असा विश्वास संघाचा कर्णधार मायकल क्लार्क याने व्यक्त केलाय.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या वॉटसनसह, जेम्स पॅटिन्सन, उस्मान ख्वाजा आणि मिशेल जॉन्सन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. या चौघांनाही उद्यापासून मोहालीत सुरू होत असलेल्या तिसऱया कसोटी सामन्यासाठीच्या संघातून वगळण्यात आले आहे. या कारवाईनंतर चिडून वॉटसन याने तडक मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. मायदेशी परतण्यापूर्वी त्याने पुढील काळात कसोटी खेळण्याचा आपण पुनर्विचार करू असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर वॉटसनच्या निर्णयाकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
वॉटसन सिडनीला परतल्यावर त्याच्याशी माझे दूरध्वनीवरून बोलणे झाले आहे आणि तो नक्कीच चौथ्या कसोटीसाठी परतेल, असा विश्वास क्लार्क याने व्यक्त केला. वॉटसन चौथ्या कसोटीसाठी परतल्यास त्याचा ऑस्ट्रेलियाच्या संघाला नक्कीच फायदा होईल, असेही क्लार्कने म्हटले आहे.