भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बोर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे नियमित कर्णधार खेळणार नाहीत. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आधीच माघार घेतली असल्याने नेतृत्वाची धुरा विराट कोहली सांभाळणार आहे. तर तंदुरुस्तीच्या कारणास्तव मायकेल क्लार्कनेही माघार घेतली आहे.
ब्रिस्बेन येथे ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी क्लार्कने अ‍ॅडलेडला होणाऱ्या भारताविरुद्धच्या दोन दिवसीय सामन्यात आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी, असे आवाहन क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले होते.
मांडीच्या दुखापतीतून अद्याप सावरला नसल्याने क्लार्कने अ‍ॅडलेड सामन्यात खेळू शकणार नसल्याचे कळवले आहे. परंतु तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी शनिवारी सिडनीत होणारा स्थानिक सामना खेळण्याचा विचार करीत असल्याचे क्लार्कने सांगितले.
अ‍ॅडलेड सामन्यातून माघार घेण्यापूर्वी क्लार्कने संघाचे तंदुरुस्तीतज्ज्ञ अ‍ॅलेक्स काउंटुरिस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर क्लार्क म्हणाला, ‘‘मी जर सर्व अपेक्षांची पूर्तता करीत शनिवारी खेळलो, तर मी पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेन. मग मात्र निवड समिती मला खेळवण्याबाबत आपला निर्णय घेऊ शकते.’’