आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याची उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू व कसोटीतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे.
आयसीसीकडून दरवर्षी हे पुरस्कार जाहीर केले जातात. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, क्लार्कची सर गारफिल्ड सॉबर्स यांच्या नावाने दिल्या जाणाऱया सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या आणि सर्वोत्कृष्ट कसोटीपटूच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हे दोन्ही पुरस्कार २००६ आणि २००७ साली ऑस्ट्रलियाच्या रिकी पाँटिंगने मिळविले होते. कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने एक हजार धावांचा टप्पा गाठणारा चेतेश्वर पुजारा हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला होता. यात पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेल्या द्विशतकाचाही समावेश आहे. पुजाराच्या या कामगिरीबद्दल आयसीसीने त्याला उदयोन्मुख क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर करण्याचे ठरविले आहे.
याआधी ३ डिसेंबरला आयीसीसीने निवडलेल्या यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट कसोटी आणि एकदिवसीय संघातही क्लार्कला स्थान देण्यात आले होते. तसेच भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार देण्यात आला होता. 
सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच क्लार्कने “हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. कारण, माझ्यापेक्षाही चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू आहेत.” असे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.