ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत १८ सुवर्णपदके जिंकणाऱ्या मायकेल फेल्प्सने अमेरिकन जलतरण स्पर्धेत २०० मीटर शर्यतीचे विजेतेपद पटकावीत रिओ ऑलिम्पिकसाठी आपल्या अपेक्षा उंचावल्या. त्याने हे अंतर एक मिनिट ५२.९४ सेकंदात पार केले.
कझानमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत हंगेरीच्या लाझ्लो सेहेने हे अंतर एक मिनिट ५३.४८ सेकंदात पार करीत सुवर्णपदक मिळविले होते. फेल्प्सने त्यापेक्षा कमी वेळ नोंदविली. या शर्यतीत २००९ मध्ये फेल्प्सने एक मिनिट ५१.५१ सेकंद असा विश्वविक्रम नोंदविला आहे.
फेल्प्सने सांगितले की, ‘‘स्पर्धात्मक जलतरणात पुनरागमन करताना मी विश्वविजेत्या खेळाडूपेक्षा कमी वेळ नोंदविली याचाच मला खूप आनंद झाला आहे. त्यामुळे मला पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकबाबत आत्मविश्वास वाटत आहे.’’