चायनामॅन कुलदीप यादवने निम्मा संघ गारद केल्यानंतर लोकेश राहुलच्या नाबाद १०१ धावा आणि त्याला रोहित शर्मा-विराट कोहली या फलंदाजांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ गडी राखून मात केली. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात मोठा विजय मिळवल्याने त्यांचं कौतुक होत आहे. पण इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याला पराभव पचलेला दिसत नाही. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर त्याने कुलदीप यादवचं तर कौतुक केलं पण टीम इंडियाला डिवचलं आणि खिल्ली उडवली.

कुलदीप यादव अडचणीत आणतोय….भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा थोडाच चांगला आहे असं ट्विट त्याने केलं. त्याचं हे विधान अर्थातच भारतीय चाहत्यांना आवडलं नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर वॉनला चांगलंच ट्रोल केलं. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 6-0 असा धुव्वा उडवला, त्याआधारे वॉनने भारतीय संघाची तुलना ऑस्ट्रेलियाशी करणं भारतीयांना अजिबात आवडलं नाही. इंग्लंडचा संघ आयर्लंडपेक्षा थोडाफार चांगला आहे. स्कॉटलॅंडच्या संघानेही इंग्लंडच्या संघाला हरवलंय अशा शब्दांमध्ये भारतीय युजर्सनी वॉनला प्रत्युत्तर दिलं.यापूर्वीही वॉनने भारतीय संघावर अनेकदा टीका केली आहे, नुकतीच त्याने जॉस बटलर धोनीपेक्षा चांगला यष्टीरक्षक-फलंदाज असल्याचं म्हटलं होतं.