तब्बल ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळतो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वन-डे सामन्यांत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यांतील विराट कोहलीचे निर्णय आणि त्याच्या कर्णधारपदाच्या शैलीवर अनेकजणं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. परंतू आजही जगभरात विराट कोहलीने लाखो चाहते आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनचा लहान मुलगाही विराटचा मोठा चाहता आहे.

“माझा लहान मुलगा क्रिकेट खेळतो…तो मला नेहमी सांगतो की विराट बॅटिंगला आला की मला उठवा. ज्यावेळी विराट बाद होतो त्यावेळी तो लगेच आत जाऊन आपलं काम करत बसतो. लहान मुलांमध्ये विराटची क्रेझ आहे. फारशी ताकद न लावता विराट ज्या पद्धतीने टायमिंग साधून फटकेबाजी करतो ते पाहण्यासारखं असतं. तो सर्वोत्तम खेळाडू आहे, त्याच्या फलंदाजीविषयी मला कधीच चिंता वाटत नाही.” वॉन Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – विराट कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल आशिष नेहराचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघासमोर आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान असणार आहे. गोलंदाजी हा दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. बुधवारी अखेरचा वन-डे सामना खेळवला जाणार आहे, ज्यासाठी विराट भारतीय संघात कोणते बदल करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – …मग कोणालाही बॉलिंग द्या, त्याने फरक पडत नाही ! आकाश चोप्राने सांगितली टीम इंडियाची खरी समस्या