ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र कर्णधार विराट कोहलीने या सामन्यातही शतक झळकावत आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इतर फलंदाज माघारी परतत असताना विराटने भक्कमपणे खेळपट्टीवर पाय रोवून शतक झळकावलं. त्याची ही खेळी पाहिल्यानंतर, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने, वन-डे क्रिकेटमध्ये विराट कोहली सचिन आणि लारापेक्षा सर्वोत्तम खेळाडू असल्याचं विधान केलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराटची शतकी खेळी व्यर्थ, मात्र अनेक विक्रम केले नावावर

रांचीच्या मैदानावर झळकावलेलं शतक हे विराटचं वन-डे कारकिर्दीतलं ४१ वं शतक ठरलं. सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला आता फक्त ८ शतकांची गरज आहे. शतक झळकावल्यानंतर मायकल वॉर्नने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन विराटची स्तुती केली.

यावर एका चाहत्याने मायकल वॉर्नला, विराट हा सचिन आणि लारापेक्षा सर्वोत्तम आहे असं तुला म्हणायचं आहे का? असं विचारलं असताना मायकलने, वन-डे क्रिकेटमध्ये तो सर्वोत्तम असल्याचं म्हटलंय.

तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ गेली असली तरीही त्याने अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतला चौथा सामना रविवारी मोहालीच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यात भारताने बाजी मारल्यास मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी भारताकडे आहे. मात्र चौथा सामनाही भारताने गमावल्यास दिल्लीत होणाऱ्या अखेरच्या सामन्यात मालिकेचा निकाल लागेल. वन-डे विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका आहे. त्यामुळे ही मालिका जिंकून विश्वचषकात सकारात्मक दृष्टीकोनाने उतरण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराटचा आक्रमक फॉर्म कायम, डिव्हीलियर्सला टाकलं मागे