माजी कर्णधार मायकेल वॉनचा इंग्लंड संघाला कानमंत्र

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत जर इंग्लंडला विजय मिळवायचा असेल तर आक्रमकपणा दाखवा व विराट कोहलीला आव्हान करा, अशा कणखर शब्दात माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंड संघाला विजयमंत्र दिला आहे.

४३ वर्षीय वॉनने फिरकीपटू आदिल रशीदच्या संघातील निवडीवरही तोंडसुख घेतले होते. या मालिकेत अ‍ॅलिस्टर कुकने कामगिरीत सातत्य राखावे व कर्णधार जो रूटने चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळींमध्ये रूपांतर करावे, अशी इच्छा वॉनने व्यक्त केली आहे. तसेच वेगवान गोलंदाज व इंग्लंडचे प्रमुख अस्त्र जेम्स अँडरसन व ख्रिस ब्रॉड यांनी कोहलीला स्विंग गोलंदाजी करून हैराण करावे, असेही सांगितले आहे.

‘‘भारताविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर जो रूट आणि त्याच्या संघाला अगदी थाटात खेळ करावा लागेल. कोहलीच्या संघासमोर खांदे पाडून किंवा निराश होऊन खेळलात तर सामना तुमच्या हातून गेलाच असे समजा. त्यामुळे अतिशय आक्रमक व जोशपूर्ण खेळ करून पाकिस्तानला हेडिंग्ली येथे जसे हरवले त्याच प्रकारचा खेळ येथे करायला पाहिजे,’’ असे वॉन म्हणाला. वॉन पुढे म्हणाला, ‘‘ या इंग्लंड संघाला तशा प्रकारच्या आवेशात खेळता यायला हवे. काही वेळा तुम्ही संघाच्या बैठकीत या गोष्टींवर चर्चा करू शकत नाही. मात्र अशा वेळी कर्णधाराने प्रत्येक खेळाडूजवळ जाऊन जोशपूर्ण भावना निर्माण केली पाहिजे. यामुळे त्यांची मानसिकता व आत्मविश्वास पराभूत होऊनही उंचावलेला असेल.’’