पहिल्या सामन्यात लाजिरवाणी हार आणि दुसऱ्या सामन्यात धमाकेदार विजय यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने अतिशय झुंजार अशी खेळी केली. ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत भारताना तब्बल १३१ षटकं खेळून काढत केवळ पाच गड्यांच्या मोबदल्यात सामना वाचवला. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर भारताकडून हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरला. या दोघांनी एकत्रित मिळून तब्बल ४३ षटकं खेळून काढली. भारतीय फलंदाजांना नावं ठेवणाऱ्या अनेकांची आज बोलती बंद झाली. भारतीय संघ कसोटी मालिकेत ४-०ने पराभूत होईल असं म्हणणाऱ्या खेळाडूनेही आपलं मत बदलून टाकलं.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारत-ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होण्याच्या वेळेस एक भविष्यवाणी केली होती. भारतीय संघ या कसोटी मालिकेत ४-० असा पराभूत होईल असं वॉन म्हणाला होता. पण भारताने पहिली कसोटी हारल्यानंतर दुसरी कसोटी जिंकली आणि तिसरी कसोटी अनिर्णित राखली. या नंतर आज वॉनने ट्विट केले. “मला कसोटी क्रिकेट प्रचंड आवडतं. भारतीय संघाने गेल्या दोन कसोटी सामन्यात त्यांच्यातील प्रतिभा दाखवून दिली. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मानसिक स्थैर्य दाखवून दिलं. याशिवाय मला असं वाटतं की ऋषभ पंत हा एक खास खेळाडू आहे. तो लवकरच सर्व प्रकारच्या क्रिकेटवर सत्ता गाजवेल”, असं ट्विट त्याने केलं.

दरम्यान, सामन्यात प्रथम ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत ३३८ धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात झटपट धावा करत भारताला विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अर्धशतक केलं. शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेला फारशी चमक दाखवता आली नाही. पण पंतने धुवाधार ९७ धावा कुटल्या. पुजारानेही ७७ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी कमाल केली. या दोघांनी सामना वाचवण्यासाठी तब्बल २५९ चेंडू म्हणजेच ४३ षटकं खेळून काढली आणि त्यात नाबाद ६२ धावांची भागीदारी केली.