गेल्या वर्षभराच्या कालावधीत आपले फलंदाजी कौशल्य उल्लेखनीय स्तरावर घेऊन गेलेल्या विराट कोहलीच्या खेळीकडे नेहमी सर्वांचे लक्ष असते. मैदानात फलंदाजीसाठी दाखल होताच भारतीय चाहत्यांनाही विराटकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात. विराटने आपल्या फलंदाजी स्तर उंचावून क्रिकेट विश्वातील अनेक माजी खेळाडूंचीही मने जिंकली आहेत. विराटची फलंदाजी पाहून अगदी प्रतिस्पर्धी खेळाडूंनीही अनेकदा त्याचे कौतुक केल्याचे आपण पाहिले आहे. त्यात आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकांची भर पडली आहे. पाकिस्तानचे प्रशिक्षक आणि द.आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू मिकी आर्थर यांनी विराट कोहलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. विराट कोहली हाच एक असा फलंदाज आहे की जो फलंदाजीला मैदानात आला की मी टेलिव्हिजनसमोर खिळून बसतो, असे मिकी म्हणाले.
वाचा: शमीची मुलगी ‘आयसीयू’त असल्याची कल्पना नव्हती- विराट कोहली
विराट कोहलीची फलंदाजी पाहणे म्हणजे पर्वणीच असते. तो उत्कृष्ट फलंदाज आहे. विराट मैदानात दाखल होताच मी टेलिव्हिजनसमोर खिळून बसतो. त्याच्या पहिल्या चेंडूपासून ते अखेरच्या चेंडूपर्यंत मी त्याची फलंदाजी टेलिव्हिजनसमोर बसून पाहतो. अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने साकारलेली १४१ धावांची खेळी अविस्मरणीय होती. त्याने पहिल्या डावात देखील शतकी खेळी साकारली होती. विराट कोहली हा एक उत्तम कर्णधार असल्याचेही ते म्हणाले. विराट जे काही करतो ते कौशल्यपूर्ण असते. क्रिकेटप्रतीची उत्कट भावनाच त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी ठरते आणि याच आत्मविश्वासावर विराट सर्वांची मनं जिंकतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 3:37 pm