महिला एकदिवसीय क्रिकेट मालिका

मिगनॉन डय़ू प्रीझने नाबाद ९० धावांची चमकदार खेळी साकारून दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट राखून प्रतिष्ठा राखणारा विजय मिळवून दिला; परंतु आयसीसी महिला एकदिवसीय अजिंक्यपद स्पध्रेचा भाग असलेली आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली.

दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २४० धावा केल्या. त्यानंतर प्रीझ आणि लॉरा वॉल्व्हार्ट (५९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी करून संघाला विजयासमीप नेले. आफ्रिकेची कर्णधार डॅन व्हॅन नीकर्कने नाबाद ४१ धावा केल्या.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन सामन्यांमध्ये धावांची टांकसाळ उघडणाऱ्या स्मृती मानधनाला या सामन्यात एकही धाव करता आली नाही. त्यानंतर कर्णधार मिताली राजही (४) स्वस्तात बाद झाली आणि भारताची २ बाद १० अशी दयनीय अवस्था झाली, पण त्या वेळी दीप्तीने हरमनप्रीतला (२५) साथीला घेत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. हरमनप्रीत बाद झाल्यावर दीप्ती आणि वेदा यांची जोडी जमली. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी रचली. ही जोडी आता संघाला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाटत असतानाच वेदा बाद झाली. तिने आठ चौकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. त्यानंतर काही काळ दीप्तीने एक बाजू सांभाळली, पण तिला शतक झळकावण्यात अपयश आले. दीप्तीने आठ चौकारांच्या जोरावर ७९ धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये शिखा पांडेने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला, त्यामुळेच संघाला २४० धावांचा पल्ला गाठता आला. शिखाने १६ चेंडूंमध्ये सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ३१ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत सर्व बाद २४० (दीप्ती शर्मा ७९, वेदा कृष्णमूर्ती ५६; शबनिम इस्माइल ४/३०) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : ४९.२ षटकांत ३ बाद २४१ (मिगनॉन डय़ू प्रीझ नाबाद ९०, लॉरा वॉल्व्हार्ट ५९; एकता बिश्त १/३८.