‘‘रोममध्ये १९६० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ४०० मीटर शर्यतीआधी मिल्खा सिंगच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. १६ इंजेक्शन्स घेतल्यानंतर शर्यतीला वेगाने सुरुवात करणारा मिल्खा सिंग पहिल्या २०० मीटर शर्यतीपर्यंत तिसऱ्या स्थानी होता. ओटिस डेव्हिस आणि कार्ल कॉफमान यांनी त्याला मागे टाकले होते. ३०० मीटर शर्यतीपर्यंत मिल्खा सिंग पाचव्या स्थानी होता. पण आघाडीवर असल्याचा दावा त्याने केला होता. रोममधील शर्यतीत मिल्खा सिंगचे एकही पाऊल आघाडीवर नव्हते. ते आघाडीवर असते तर त्याचे सुवर्ण किंवा रौप्यपदक हुकले असते, कांस्य नाही. मिल्खाने विश्वविक्रम मोडीत काढेन असा दावा केला होता, पण त्याला ते कधीच जमले नाही,’’ असे महान अॅथलीट गुरबचनसिंग रंधवा यांनी सांगितले.
‘इंडियन एक्स्प्रेस’चे प्रमुख संपादक शेखर गुप्ता यांनी ‘वॉक द टॉक’ या कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीदरम्यान गुरबचनसिंग यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘‘मिल्खा सिंग आणि मी १९६०, १९६२च्या आशियाई स्पर्धेत तसेच १९६४च्या ऑलिम्पिकमध्ये एकाच संघात होतो. आम्ही बऱ्याच सराव शिबिरांमध्ये एकत्र सराव केला आहे. १९६२मध्ये मिल्खाने दोन तर मी चार राष्ट्रीय विक्रम नोंदवले होते. त्याच वर्षीच्या आशियाई स्पर्धेत मिल्खाने सुवर्णपदक पटकावले होते तर मी सर्वोत्तम अॅथलिटचा पुरस्कार पटकावला होता. राष्ट्रीय स्पर्धाचा विचार केला तर मिल्खापेक्षा माझी कामगिरी सरस झाली आहे. फक्त ऑलिम्पिकमध्ये मिल्खाने मला मागे टाकले,’’ असेही गुरबचनसिंग यांनी सांगितले.
यावेळी १९६४च्या टोकियो ऑलिम्पिकची आठवण गुरबचन यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘‘तू शर्यतीत शेवटच्या क्रमांकावर येशील, अशा शब्दांत पाकिस्तानचा तीन वेळचा ऑलिम्पिक विजेता अब्दुल रझाक याने मला चिथावले होते. पण उपांत्य फेरीत मी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारल्यानंतर ‘तुझ्यात पदक जिंकण्याची क्षमता आहे’, असे रझाकने जवळ येऊन मला सांगितले होते. अंतिम शर्यतीआधी त्याने हा संदेश दिल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला होता. त्याच शर्यतीत मी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती.’’