ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याचे माझे स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली, परंतु हे स्वप्न अपुरेच राहिले. माझे हे स्वप्न युवा पिढीतील खेळाडूंनी साकार करावे, असे ज्येष्ठ ऑलिम्पिक धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांनी सांगितले.

आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (एआयटी) ‘पेस २०१८’ या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता मिल्खा सिंग यांच्या हस्ते झाली. एआयटीचे अध्यक्ष मेजर जनरल जलज भोला  व निवृत्त ब्रिगेडियर अभय भट हे या वेळी उपस्थित होते. द्वितीय वर्षांचा विद्यार्थी राहुल सिंगने मिल्खा सिंग यांचे काढलेले तैलचित्र त्यांना भेट देण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवनावर आधारित लघुपटही दाखवण्यात आला.

‘‘भरपूर  मेहनत आणि चिकाटी ठेवली तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही, मात्र उद्दिष्ट गाठायचे असेल तर अहोरात्र कष्ट करण्याला पर्याय नाही. पालकांनीही आपल्या मुलांवर अथक परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे,’’ असे मिल्खा सिंग यांनी सांगितले.

या महोत्सवात ५० महाविद्यालयांतील खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये क्रिकेट, कबड्डी, स्क्वॉश, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल आदी अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश होता. युद्धात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांकरिता निधी जमवण्यासाठी आठ किलोमीटर अंतराची शर्यत आयोजित करण्यात आली होती. त्याचे उद्घाटनही मिल्खा सिंग यांच्या हस्ते झाले.