‘फ्लाइंग सिख’ या टोपणनावाने गौरवले जाणारे मिल्खा सिंग यांचा आज ९०वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १९२९ साली पाकिस्तानात झाला होता. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. परंतु तक्तालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या आग्रहामुळे त्यांना पाकिस्तानात जावे लागले होते, जाणून घेऊया काय होता तो किस्सा..

१९६० साली भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत होणारे सामने वरकरणी मैत्रीपूर्ण वाटत असले, तरी ते प्रतिष्ठेचे होते. त्यामुळे जवाहरलाल नेहरु यांनी मिल्खा सिंग यांना या स्पर्धेत खेळण्याची विनंती केली होती. त्यावेळी मिल्खा भारतातील सर्वाधिक वेगवान धावपटू होते. परंतु त्यांची या स्पर्धेत भाग घेण्याची मूळीच इच्छा नव्हती.

कारण स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीदरम्यान उसळलेल्या दंगलीत पाकिस्तानातील मुलतानजवळील लायलूर गावात मिल्खा सिंग यांच्या आई-वडिलांची हत्या झाली होती. त्यावेळी रात्रभर पळून त्यांनी स्वत:चा जीव वाचवला होता. त्यानंतर त्यांनी महिलांच्या डब्यातून लाहोरमार्गे दिल्ली गाठली. ज्या ठिकाणी त्यांच्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली त्या धर्तीवर पुन्हा कधीच आपण पाऊल ठेवणार नाही अशी मनोमन शपथ त्यांनी घेतली होती. त्यामुळे त्यांनी नेहरुंच्या विनंतीला पहिल्यांदा नकार दिला होता. परंतु त्यानंतर केवळ देशावरील प्रेमाखातर त्यांनी पाकिस्तानात जाऊन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानात पोहोचताच ‘मिल्खा-अब्दुल खालिद की टक्कर’ असे या स्पर्धेचे वर्णन होऊ लागले. पण वाऱ्याच्या वेगाने धावून मिल्खा यांनी अब्दुल खालिदला हरवले. त्यावेळी पाकिस्तानात भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खांना पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी दिली.