महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या प्रेरणेमुळेच मी आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवू शकलो, अशा शब्दांत जागतिक अपंग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या देवेंद्र झझारिया याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘‘अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वोत्तम कामगिरी साकारायची असल्यास सर्वस्व अर्पण करावे लागते. स्टेडियममध्ये कामगिरी करत असल्यास, संपूर्ण जगाशी नाते तोडावे लागते. त्या वेळीच आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करता येते, असे मोलाचे मार्गदर्शन मिल्खा सिंग यांनी मला केले होते. मिल्खा सिंग हे पुरस्कार समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी माझी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती,’’ असे भालाफेकपटू झझारियाने सांगितले.आपल्या कामगिरीविषयी झझारिया म्हणाला, ‘‘मी स्टेडियममध्ये आल्यावर चीनच्या भालाफेकपटूने रचलेला ५५.५० मीटरचा जागतिक विक्रम मोडण्याचे ध्येय मी आखले होते. पाचव्या प्रयत्नापर्यंत मी आघाडीवर होतो. पण अखेरच्या फेकीनंतरही मला विक्रम मोडता आला नाही. ’’