टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२१मध्ये पुन्हा लांबणीवर टाकल्यास लक्षावधी डॉलर्सचा फटका आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) बसेल, असे अध्यक्ष थॉमस बाख यांनी सांगितले.

‘‘ऑलिम्पिक सध्याच्यास्थितीत लांबणीवर टाकण्यात आल्याने याआधीच लाखो डॉलर्सचा फटका बसला आहे. ऑलिम्पिक लांबल्याने जो वाढीव खर्च आहे त्याचा भार आयओसीवरदेखील पडत आहेच,’’ याकडेही बाख यांनी लक्ष वेधले. ‘‘करोनातून बाहेर पडल्यानंतर कशी परिस्थिती असेल याचा कोणालाच अंदाज नाही. मात्र ऑलिम्पिक खेळाडूंसाठी सुरक्षित आणि चांगल्या आरोग्यदायी वातावरणात पडेल ही जबाबदारी आमची आहे,’’ असे बाख यांनी सांगितले.

‘आयओसी’चे सदस्य जॉन कोएट्स यांनी ऑलिम्पिक होण्यासाठी करोनावर लस सापडणे गरजेचे आहे हा शास्त्रज्ञांचा दावा खोडून काढला आहे. ‘‘जागतिक आरोग्य संघटनेकडून ऑलिम्पिकची जी पुढील वर्षांची तारीख आम्ही ठरवली आहे त्यादृष्टीने तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. करोनावर लस सापडणे ही चांगली बाब असेल. मात्र लस संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत,’’ असे कोएट्स यांनी सांगितले.