भारतामध्ये फुटबॉलचा अधिक प्रचार-प्रसार करण्याबरोबरच युवा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून पाचसदस्यीय गुणवत्ता शोध समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे या मोहिमेला आर्थिक मदत करण्यात येणार असून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या देखरेखीखाली ही शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. पुढील महिन्यापर्यंत समिती स्थापन करण्यात येण्याची शक्यता आहे.

‘‘प्रतिभावान फुटबॉलपटूंचा शोध घेण्यासाठी देशाच्या प्रत्येक विभागातून (पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ईशान्य) लवकरच पाचसदस्यीय समितीची स्थापना करण्यात येईल. १२ वर्षांखालील मुलामुलींचा शोध घेण्याचे कार्य ही समिती करेल. २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने फुटबॉलमध्येही पात्रता मिळवावी, या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे,’’ असे रिजिजू म्हणाले.