‘भारतरत्न’ या सर्वोच्च भारतीय पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने महान हॉकीपटू ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस केली आहे. ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात आल्याचे क्रीडा सचिव पी.के.देब यांनी सांगितले. या पुरस्कारासाठी केवळ ध्यानचंद यांच्याच नावाची शिफारस करण्यात आली आहे. पंतप्रधान शिफारसीचा अभ्यास करून मान्यतेसाठी हा प्रस्ताव राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पाठवतील असे त्यांनी पुढे सांगितले. ध्यानचंद यांचा मुलगा अशोक कुमारचा समावेश असलेल्या सहा सदस्यीय शिष्टमंडळाने १२ जुलै रोजी केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी आणि ध्यानचंद यांचा नातू गौरव सिंग यांचाही समावेश होता. १९२८ (अॅमस्टरडॅम), १९३२ (लॉस एँजेलिस) आणि १९३६ (बर्लिन) ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात ध्यानचंद यांचे मोलाचे योगदान होते. या सर्वोच्च पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरच्या नावाची चर्चा होती. मात्र बीसीसीआयने शिफारस न केल्याने तसेच तो अजूनही खेळत असल्याने सचिनचा या पुरस्कारासाठी विचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.