21 September 2020

News Flash

उंचावलेल्या मनोधैर्याचा लाभ होईल!

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक व घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ याचा फायदा घेत भारतीय हॉकी संघ आगामी चॅम्पियन्स स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवू शकेल, असा

| December 1, 2014 04:51 am

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक व घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ याचा फायदा घेत भारतीय हॉकी संघ आगामी चॅम्पियन्स स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवू शकेल, असा आत्मविश्वास ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मीररंजन नेगी यांनी व्यक्त केला.
नेगी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताकडून गोलरक्षक म्हणून काम करताना नावलौकिक मिळविला आहे. खेळाडूपेक्षाही प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली आहे. १९९८मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे गोलरक्षणाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी राष्ट्रकुल स्पर्धा (२००२) व आशिया चषक स्पर्धेमध्ये (२००४) अजिंक्यपद मिळविले होते. भुवनेश्वरला होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पध्रेतील भारताच्या संभाव्य कामगिरीविषयी व एकूण भारतीय हॉकी क्षेत्राविषयी नेगी यांच्याशी केलेली बातचीत-

चॅम्पियन्स स्पर्धेत भारताला विजेतेपदाची कितपत संधी आहे ?
या स्पर्धेत भारताला साखळी गटात नेदरलँड्स, जर्मनी व ऑस्ट्रेलिया या तीन बलाढय़ संघांचे आव्हान आहे. हे तीनही संघ माजी विश्वविजेत आहेत. या तिन्ही संघांच्या खेळांडूंची शैली आपल्यासाठी नेहमीच जड ठरणारी असते. तरीही आपल्याला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळणार आहे. भारतीय खेळाडूंना अनुकूल वातावरण, प्रेक्षकांचा पाठिंबा व अनुकूल मैदान याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे.

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याने खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे काय?
आशियाई क्रीडा स्पर्धेत १९९८नंतर प्रथमच यंदा आपल्या देशाने सुवर्णपदक मिळविले आहे. साहजिकच भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले आहे. संघ अतिशय चांगल्या रीतीने बांधला गेलेला आहे. संघात जरी दोन-तीन बदल झालेले असले तरी त्याचा फारसा परिणाम संघाच्या कामगिरीवर पडणार नाही. सरदारा सिंग हा अतिशय अनुभवी कर्णधार असून खेळाडूंकडून इप्सित ध्येय साकार करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. आशियाई स्पर्धेपूर्वी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. त्याचाही फायदा आपल्या खेळाडूंना मिळेल.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचा भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल काय?
वॉल्श यांनी गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये भारतीय संघाची खूप चांगली बांधणी केली होती. वॉल्श हे स्वत: अनेक ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळले आहेत व संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा भारतीय संघास खूप चांगला फायदा झाला असता. निदान रिओ ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत तरी त्यांना ठेवायला पाहिजे होते. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले असल्यामुळे वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेसाठी सरावाचे खूप योग्य रीतीने नियोजन करता आले असते.

परदेशी प्रशिक्षकाची भारतीय संघाला आवश्यकता आहे काय?
वरिष्ठ संघातील खेळाडू खूप परिपक्व असतात. त्यामुळे अनेक वेळा भारतीय प्रशिक्षकांबरोबर त्यांचे सूर जुळत नाहीत. सुसंवाद राहत नाही. याउलट कनिष्ठ संघांना परदेशी प्रशिक्षकांसाठी काही वेळा सुसंवादाबाबत अडचण होऊ शकते. साहजिकच कनिष्ठ संघासाठी भारतीय प्रशिक्षक व वरिष्ठ संघासाठी परदेशी प्रशिक्षक नियुक्त करणे हॉकीसाठी हितावह आहे.

भारतीय हॉकी क्षेत्रात सध्या सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे काय?
होय. राष्ट्रकुल स्पर्धा व आशियाई क्रीडा स्पर्धामधील लक्षणीय कामगिरीमुळे भारतीय हॉकी क्षेत्रात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा हॉकी संघटकांनी घेतला पाहिजे. हॉकी लीगसारख्या अनेक स्पर्धासाठी भरपूर प्रायोजक मिळू लागले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन भारतास मिळू लागले आहे. केवळ संयोजनस्तरावर नव्हे तर प्रत्यक्ष स्पर्धेतही अव्वल कामगिरी कशी होईल याचा विचार भारतीय संघटकांनी बारकाईने केला पाहिजे.

या खेळाचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची गरज आहे?
मुळातच शालेय स्तरावर क्रीडा क्षेत्राबाबत उदासीनता दिसून येऊ लागली आहे. मैदाने ओस पडू लागली आहेत. क्रीडाशिक्षकाकडे जर शारीरिक शिक्षणाखेरीज अन्य कोणतीही कामे दिली नाहीत व त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली तर निश्चितच आपल्या या कामाकडे तो नोकरी म्हणून नव्हे तर क्रीडाविकासाचा घटक म्हणून तो काम करू शकेल. प्रत्येक शाळेत खेळाचा एक तास अनिवार्य असतो, मात्र त्याचा फारसा उपयोग शाळा व्यवस्थापनाकडून केला जात नाही. हीच खरी शोकांतिका आणि क्रीडा क्षेत्रामधील मोठी अडचण आहे. ही अडचण दूर झाल्यास भारत हा क्रीडा क्षेत्रात अग्रेसर देश होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 4:51 am

Web Title: mir ranjan negi former hockey champion interview
Next Stories
1 तिवारी की सवारी!
2 ह्य़ुजेसच्या निवासस्थानी अ‍ॅडलेडला आता पहिली कसोटी
3 अ‍ॅबॉटला कुणीही जबाबदार धरलेले नाही!
Just Now!
X