नवी दिल्ली : दुखापतीतून सावरल्यानंतर वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने दणक्यात पुनरागमन केले असून सरावादरम्यान अधिक वजन उचलण्याचा ती प्रयत्न करीत आहे. येत्या काही महिन्यांत कठोर सराव करून टोक्यो ऑलिम्पिकआधी २१० किलो वजन उचलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसे घडल्यास, ऑलिम्पिकआधीच विश्वविक्रम माझ्या नावावर होईल, हे ध्येय गाठणे सोपे नसले तरी त्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे, असे भारताची जागतिक सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू हिने सांगितले.

पाठीच्या दुखापतीमुळे आठ महिने खेळू न शकलेल्या मीराबाईने गेल्या आठवडय़ात थायलंड येथे झालेल्या ईजीएटी चषक स्पर्धेत १९२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. ४९ किलो वजनी गटात लढणाऱ्या मीराबाईने प्रतिस्पध्र्याना धूळ चारण्यासाठी अधिकाधिक वजन उचलण्याचे ध्येय बाळगले आहे. ‘‘आता ४९ किलो वजनी गटात खेळताना प्रतिस्पध्र्याकडून कडवी चुरस मिळणार आहे. लवकरच २०० किलो वजन उचलून सर्वानाच आश्चर्याचा धक्का देण्याच्या विचारात आहे,’’ असेही मीराबाईने सांगितले.

गेल्या वर्षी, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने ऑलिम्पिक आणि अन्य प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये पुरुष तसेच महिलांच्या वजनी गटात बदल केले आहेत. त्यामुळे ४८ किलो वजनी गटात उतरणाऱ्या मीराबाईला आता ४९ किलो वजनी गटात खेळावे लागणार आहे. गेल्या दीड वर्षांत मीराबाईने आपल्या एकूण वजन उचलण्याच्या प्रक्रियेत १० किलोंनी सुधारणा केली आहे. त्यामुळे १९६ किलो वजन उचलून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मीराबाईने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.