राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती दुखापतींमुळे त्रस्त; मागील सहा आठवडे सरावापासून दूर 

नवी दिल्ली : प्रतिष्ठेच्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघा एक महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाच भारताला पदक मिळवून देण्याची प्रबळ दावेदार असलेल्या वेटलिफ्टिर मीराबाई चानू हिच्यावर स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता बळावली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे गेले सहा आठवडे सरावापासून दूर असलेल्या मीराबाईवर आशियाई स्पर्धेला मुकण्याची नामुष्की ओढावू शकते. त्यामुळेच, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी मीराबाई आशियाई स्पर्धेच्या आधी पूर्णपणे तंदुरुस्त होणार का, हा प्रश्न सर्वाना भेडसावत आहे.

एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुलमध्ये मीराबाईने विक्रमी १९६ किलो (८६ किलो स्नॅच + ११० किलो जर्क) वजन उचलून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. २०१४च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मार्गरिटा येलिसेव्हाच्या (१९४ किलो) सर्वोत्तम विक्रमालाही तिने त्या वेळी मागे टाकले होते.

भारतीय वेटलिफ्टिंग संघाचे प्रशिक्षक विजय शर्मा याविषयी म्हणाले, ‘‘मागील सहा आठवडय़ांपासून मीरा सराव शिबिरात सहभागी झालेली नाही. आगामी आव्हानांचा विचार करता तिचे आशियाई स्पर्धेअगोदर दुखापतीतून सावरणे कठीण वाटत आहे. तसेच सरावाला सुरुवात केल्यासही काही मिनिटांतच तिला त्रास जाणवत आहे.’’ मीराबाईला दुखापतीतून सावरण्यासाठी किती काळ लागेल याविषयी शर्मा यांनी काहीही सांगितले नसले तरी संघातील इतरांनी आता तिची जागा भरून काढणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही २३ वर्षीय मीराबाईने १९४ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले होते. सध्या मीराबाई हिमाचल प्रदेश येथे असून लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी वैद्यांनी तिला दिवसातून किमान एक तास व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.

उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे कांचन निलंबित

पटियाला येथे झालेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे भारताची वेटलिफ्टर पी. एम. कांचनला निलंबित करण्यात आले आहे. भारतीय वेटलिफ्टिंग चमूचे प्रशिक्षक विजय शर्मा यांनीच या गोष्टीची पूतर्ता केली. कांचनने २०१५च्या कनिष्ठ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. यंदा मँगलोर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर तिचा प्रमुख भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. याआधी संजित चानूलाही मे महिन्यात उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. तिच्या चाचणीची अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्यावरच तिच्या आशियाई स्पर्धेतील प्रवेशबाबत निर्णय घेतला जाईल.