नवी दिल्ली : माजी विजेती मीराबाई चानू हिच्यासह सात जणांचा भारतीय संघ थायलंडमधील पट्टाया येथे १८ सप्टेंबरपासून होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळवून टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सुक आहेत.

मीराबाई चानू (४९ किलो), राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती झिल्ली दालाबेहेरा (४५ किलो), स्नेहा सोरेन (५५ किलो), राखी हल्देर (६४ किलो) या महिला गटात भारताचे प्रतिनिधित्व करतील. पुरुषांमध्ये, युवा ऑलिम्पिकचे सुवर्णपदक पटकावणारा जेरेमी लालरिंगुआ (६७ किलो), राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता अजय सिंह (८१ किलो) आणि राष्ट्रीय विजेता अचिंत शेऊली (७३ किलो) यांच्यावर भारताच्या आशा असतील.

२०१७च्या जागतिक स्पर्धेत मीराबाईने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावल्यामुळे तिच्याकडून भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. २०१८च्या जागतिक स्पर्धेत दुखापतीमुळे खेळू शकली नसली तरी मीराबाईने पाठीच्या दुखापतीतून जवळपास नऊ महिन्यांनी जोमाने पुनरागमन केले आहे.