टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होण्याकरिता भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानूला अमेरिकेत सरावाची परवानगी मिळाली आहे. मीराबाईच्या सरावासाठी लागणारा ४० लाखांचा खर्च भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) करण्यात येणार आहे.

मीराबाई तिच्या दोन प्रशिक्षकांसह लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे. अमेरिकेतील कॅन्सास सिटी येथे ती दोन महिने सराव करणार आहे. मीराबाई ही ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ या उपक्रमातील निवडक खेळाडू असल्याने तिच्या सरावाचा खर्च ‘साइ’ करणार आहे. अमेरिकेत सराव करतानाच ती आपल्या जुन्या दुखण्यावरही उपचार करवून घेणार आहे.

‘‘अमेरिकेत मीराबाईच्या सरावाचा खर्च एकूण ४० लाख रुपये अपेक्षित आहे. तो आम्ही उचलणार आहोत. अमेरिकेतील सरावाचा फायदा मीराबाईला ऑलिम्पिक पात्रतेसाठी होईल,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. मीराबाई पुढील वर्षी एप्रिलमध्ये नूर-सुलतान येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून टोक्योसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करेल. त्या स्पर्धेत २१० किलो वजन उचलण्याचा मीराबाईचा प्रयत्न असेल.