वेस्ट इंडिजवर १०१ धावांनी मात करीत मालिका विजय

मालिकेतील आणि कारकीर्दीतील अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याचे भाग्य पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक आणि युनिस खान यांच्या नशिबात आले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १०१ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानने मालिका २-१ अशी खिशात टाकली आणि आपल्या दोन अनुभवी खेळाडूंना गोड निरोप दिला.

कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ विजय मिळवण्यासाठी ३०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करीत होता. पण पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाहने वेस्ट इंडिजचा अर्धा संघ गारद करीत त्यांचे कंबरडे मोडले, यासिरला हसन अलीने तीन बळी मिळवत चांगली साथ दिली. या दोघांच्या गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने नाबाद १०१ धावांची खेळी साकारून पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समर्थपणे प्रतिकार केला, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही आणि त्यामुळे वेस्ट इंडिजला सामना गमवावा लागला.

या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या चेसला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला, तर मालिकेत भेदक आणि अचूक गोलंदाजी करणाऱ्या यासिरला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.